आता ‘वेध’ गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचे…

कृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काही ठिकाणी दुर्घटना घडल्या. जवळपास तीन जणांचा मृत्यू झाला, तर दीडशेच्या वर जखमी झाले. मात्र, एकंदरीत दहीहंडी उत्सव आनंदात पार पडला. आता सगळ्यांना वेध लागले आहेत गणेशोत्सवाचे. कोकणवासीय आणि गणेशोत्सव हे समीकरणच काहीसे वेगळे आहे. आता कोकणात जाणार्‍यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे जायचे कसे, ही चिंता आहेच. त्यातल्यात्यात काही पक्षांनी अख्खी रेल्वेगाडी बुक करून कोकणवासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
गणेशोत्सवात गावी जाणार्‍यांची संख्या केवळ कोकणवासीयांचीच नाही, तर अनेक ठिकाणी भाविक जात असतात. मात्र, याच काळात खाजगी वाहतूकदारांकडून तिप्पट- चौपट भाडेआकारणी सुरू झाली आहे. त्याचबरोबर गणेशमूर्तींच्या किमतीदेखील 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सध्या सगळीकडे गाजतो आहे तो डीजेचा दणदणाट. अनेकांना आक्षेप आहे तो डीजेच्या कानठळ्या बसणार्‍या आवाजाचा. शासन-प्रशासनाने मर्यादा घालून दिलेली असताना त्याचे पालन होत नाही म्हणून अखेर डीजे, डॉल्बीसारखी वाद्ये यावर बंदीच आणावी, अशी मागणी आता पुढे आली आहे. यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सांस्कृतिक नगरी पुण्यात तर या विषयावरून चांगलेच रणकंदन माजले आहे. गणेशोत्सवासारखे धार्मिक सण साजरे करताना त्याचे पावित्र्य, त्यातील धार्मिकता राखली जाणे अपेक्षित आहे. पण नेमके तेच होत नाही. यामुळेच वादविवादाला तोंड फुटले आहे. गणेशोत्सव किंवा इतर धार्मिक सण हे सलोख्याने, एकोप्याने आणि तितक्याच धार्मिक भावनेने साजरे केले पाहिजेत.
एरवी सोयीस्करपणे राजकारणाचा भाग म्हणून चिनी वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन केले जाते. मात्र, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी असे सण साजरे करताना बहुतांश चिनी वस्तूंचाच वापर केला जातो. आतादेखील सगळीकडे चिनी मालाने बाजारपेठा फुलल्या आहेत. नवरात्रात एका विशिष्ट धर्मातील लोकांना प्रवेश निषिद्ध केला जातो आणि आयोजकांना येणार्‍यांचे ओळखपत्र तपासण्याचे आवाहन केले जाते. आतादेखील तसे आवाहन केले जात आहे, ’मेरे अंगन मे तुम्हारा क्या काम है’ अशा पद्धतीने सणवारांत भेदाभेद होऊ लागले आहेत. कावड यात्रा मार्गावरदेखील एखाद्या धर्माच्या दुकानांना बंदी करण्यात येते, हे कितपत योग्य आहे? याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
एकीकडे असे प्रकार होत आहेत, तर दुसरीकडे राजकीय नेते, देशाचे नेतृत्व करणारे मात्र धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गुरुद्वारा, मशीद, चर्चमध्ये जातात. सर्वपक्षीय नेते इफ्तार पार्टी करतात, हे अनेकदा अधोरेखित झाले आहे. देशात सर्वधर्मसमभाव टिकला पाहिजे यासाठी धार्मिक सण-उत्सव साजरे करताना अशी भावना ठेवली जाते आणि तेच देश व समाजहिताचे आहे. त्यामुळेच देशात एकोपा, सलोखा टिकून राहतो आणि सगळ्यांनी याच पवित्र भावनेने धार्मिक सण-उत्सव साजरे केले पाहिजेत.

Now, the focus shifts to Ganeshotsav and Navratrotsav…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *