– अश्विनी पांडे
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नाशिक दौर्यावर येणार असल्याने शहर व जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. राष्ट्रीय नेतृत्वातील प्रमुख नेता नाशिकमध्ये येत असल्याने वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणार्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांपासून नव्या पिढीतील युवकांपर्यंत अनेकांनी त्यांच्या भेटीची अपेक्षा बाळगली होती. स्थानिक प्रश्न, संघटनेतील अडचणी, पक्षातील अंतर्गत समन्वय आणि आगामी राजकीय लढाई याबाबत थेट राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा होती. मात्र, दौरा पार पडला आणि अनेक कार्यकर्त्यांच्या पदरी राहिली ती भेटीची हुरहूर. राहुल गांधी नाशिकमध्ये आले, पण तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते काहीसे दूरच राहिले, अशी भावना आता काँग्रेसच्या स्थानिक वर्तुळात उमटू लागली आहे.
राहुल गांधी यांचा नाशिक दौरा संघटन सृजन अभियानांंतर्गत आयोजित दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपासाठी होता. काँग्रेसच्या संघटनात्मक पुनर्बांधणीचा हा प्रयत्न मानला जात आहे. महाराष्ट्रातील नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आणि संघटनात्मक पदाधिकार्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी पक्षाला पुन्हा तळागाळात नेण्याची गरज अधोरेखित केली. जनसामान्यांशी थेट संपर्क साधा, त्यांच्या प्रश्नांंवर आवाज बुलंद करा आणि पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवा, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. 2029 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी आतापासूनच संघटन उभारणीवर भर देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. हा प्रयत्न पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा असला, तरी त्याचा पाया असलेल्या कार्यकर्त्यांशीच संवाद न झाल्याने दौर्याच्या यशस्वितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तळागाळात पक्ष मजबूत करायचा असेल तर कार्यकत्यार्ंचा आवाज आधी ऐकावा लागतो. राहुल गांधींच्या दौर्यात मात्र स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने भेटीपासून दूर राहिले. राष्ट्रीय नेतृत्वाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल, या अपेक्षेने अनेक कार्यकर्ते उत्सुक होते; परंतु प्रत्यक्षात शिबिराचे स्वरूप आणि प्रवेशाचे नियोजन मर्यादित असल्याने अनेकांना आत प्रवेशही मिळाला नाही. काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनाही राहुल गांधी यांची भेट घेता आली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे ज्यांना भेटीची संधी मिळाली आणि ज्यांना मिळाली नाही, अशा दोन गटांची मानसिकता पक्षाच्या अंतर्गत राजकारणात निर्माण होऊ नये, ही काळजी आता पक्षातील वरिष्ठांना घ्यावी लागणार आहे.
राहुल गांधींच्या दौर्याची चर्चा केवळ पक्षसंघटनेपुरती मर्यादित नव्हती. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या विकासकामांमुळे या दौर्याकडे राजकीयदृष्ट्याही लक्ष लागले होते. त्यातच आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन, एसआयआर मोहीम, शेतकर्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि शक्तिपीठ महामार्ग यांसारखे विषयही चर्चेत आले. नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील प्रतिनिधींनी राहुल गांधी यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. स्थानिक प्रश्न राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचले, हे दौर्याचे निश्चितच सकारात्मक फलित म्हणावे लागेल. मात्र, दुसरीकडे शहर काँग्रेसच्या अंतर्गत प्रश्नांंचे काय, हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. शहरातील अनेक समस्या घेऊन जनतेत जाण्याची संधी काँग्रेससमोर आहे. रस्ते, वाहतूक, पाणी, विकासकामे, कुंभमेळ्याच्या नियोजनातील प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर जनतेत असंतोष आहे. सत्ताधार्यांवर टीका करण्यासाठी काँग्रेसकडे मुद्दे आहेत, पण त्या मुद्द्यांना आक्रमकपणे जनतेपर्यंत नेण्यासाठी संघटना किती सक्षम आहे, हा खरा प्रश्न आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आणि नाराजी नवीन नाही. पक्षातील अनेक नेते आणि पदाधिकारी खासगीत ही बाब मान्य करतात. काही कार्यकर्ते सक्रिय असूनही त्यांना योग्य संधी मिळत नसल्याची भावना आहे, तर काही ठिकाणी नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमध्ये संवादाचा अभाव जाणवतो. अशा परिस्थितीत राहुल गांधींच्या दौर्यातून कार्यकर्त्यांना थेट ऊर्जा मिळणे अपेक्षित होते. त्याऐवजी भेटीची संधी न मिळाल्याने नाराजीची भर पडली, तर संघटन बळकट करण्याच्या प्रयत्नालाच धक्का बसू शकतो. खरे तर देशात भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने हातपाय पसरत आहे. त्याला अटकाव करण्यासाठी काँग्रेसकडे मोठी संधी होती. मात्र, राहुल गांधी यांना ती साधता आली नाही.
राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांना जनतेत जाण्याचा संदेश दिला आहे. आता नाशिक शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाची खरी परीक्षा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या सूचनांची अंमलबजावणी किती प्रामाणिकपणे होते, स्थानिक प्रश्नांंवर काँग्रेस किती आक्रमक होते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, कार्यकर्त्यांमधील नाराजी किती वेगाने दूर केली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण वरिष्ठ नेत्यांचे दौरे, प्रशिक्षण शिबिरे आणि मार्गदर्शनाचे कार्यक्रम यामुळे संघटनेला दिशा मिळू शकते, पण पक्षाला प्रत्यक्ष उभे करतो तो बूथवरचा कार्यकर्ता. निवडणुकीच्या काळात मतदारांच्या दारापर्यंत पोहोचणारा, आंदोलनात रस्त्यावर उतरणारा आणि पक्ष अडचणीत असतानाही झेंडा हातात ठेवणारा कार्यकर्ता जर स्वतःला नेतृत्वापासून दूर समजू लागला, तर संघटन सृजनाची संकल्पनाच कमकुवत ठरू शकते. त्यामुळे राहुल गांधींच्या दौर्याचे खरे फलित त्यांच्या भाषणात किंवा शिबिरातील मार्गदर्शनात नाही, तर त्यानंतर शहर काँग्रेसमध्ये किती बदल घडतो यात आहे. भेट न झालेल्या नेते-पदाधिकार्यांची नाराजी दूर करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे, अंतर्गत गटबाजीला आळा घालणे आणि स्थानिक प्रश्नांंवर आक्रमक आंदोलन उभे करणे, ही जबाबदारी आता स्थानिक नेतृत्वाची आहे. अन्यथा परिस्थिती अशीच राहिली तर वरिष्ठ नेते येतील, मार्गदर्शन करतील, शिबिरे भरतील, छायाचित्रे प्रसिद्ध होतील, पण पक्षाची प्रत्यक्ष ताकद वाढणार नाही. उलट राहुल गांधींना भेटलेला एक वर्ग आणि भेट न मिळालेला दुसरा वर्ग अशी सुप्त विभागणी काँग्रेसमध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राहुल गांधी नाशिकमध्ये आले, त्यांनी पक्षाला संघटन बळकटीकरणाची दिशा दिली आणि ते निघून गेले. आता त्या दिशेने चालण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष उभा करायचा की कार्यकर्त्यांनाच प्रतीक्षेत ठेवून संघटन सृजनाची भाषा करायची, याचा निर्णय आता स्थानिक नेतृत्वाला घ्यावा लागणार आहे. कारण काँग्रेसची खरी पुनर्बांधणी व्यासपीठावरून नाही, तर कार्यकर्त्याच्या मनातील नाराजी दूर करून होणार आहे.
What is the outcome of the tour?