– प्रशांत पोतदार
शहरातला एक जुना मित्र अनेक वर्षांनी भेटला. दोघेही एका चहाच्या टपरीवर बसले. चहा समोर आला आणि मित्राने सहज विचारले, काय म्हणतोस? खूप विकास झाला ना आपल्या देशाचा? मी हसलो. हो. पण एक प्रश्न आहे. काय? विकास कुठे आहे? तो क्षणभर माझ्याकडे पाहत राहिला.
काय म्हणतोस? बघ ना आजूबाजूला. पूर्वी नसलेल्या कितीतरी सुविधा आज आहेत. मोबाइल आहे, इंटरनेट आहे, उत्तम रस्ते आहेत, मोठमोठी रुग्णालये आहेत. मेडिकल क्षेत्राने तर किती प्रगती केली! पूर्वी अशक्य वाटणार्या आजारांवर उपचार होतात. शिक्षणाच्या पद्धती बदलल्या. मुलांना जगभरातील ज्ञान एका क्लिकवर मिळतं. मग अजून विकास कुठे हवा?
मी म्हणालो, मला हाच प्रश्न पडतोय. एवढी प्रगती झाली, मग माणूस किती पुढे गेला? तो पुन्हा शांत झाला. आपण शिक्षणाचा दर्जा सुधारला. शाळा बदलल्या, अभ्यासक्रम बदलले, तंत्रज्ञान वर्गात आले. पण शिक्षणामुळे माणसाची विचार करण्याची क्षमता, प्रश्न विचारण्याची सवय, दुसर्याचा विचार करण्याची वृत्ती वाढली का?
आज माहिती मिळवणे सोपे झाले आहे; पण माहितीचे आकलन करण्याची क्षमता वाढली आहे का? मेडिकल क्षेत्राने प्रचंड प्रगती केली. आयुष्य वाचवण्याची क्षमता वाढली. उपचारांच्या सुविधा वाढल्या. पण समाजातील माणसाची दुसर्याच्या दुःखाकडे पाहण्याची संवेदनशीलता वाढली का? आपण जग जवळ आणले.
मोबाइलमुळे हजारो किलोमीटर दूर असलेली व्यक्ती एका क्षणात आपल्या जवळ आली. पण शेजारच्या घरात कोण राहते, त्याची विचारपूस करण्यासाठी आपल्याकडे वेळ उरला का? सामाजिक जीवन सुलभ झाले. व्यवहार सोपे झाले.
प्रत्येक गोष्ट काही सेकंदांत उपलब्ध होऊ लागली. पण माणसामाणसांमधील नाती तितकीच सुलभ झाली का? पूर्वी साधनांची कमतरता होती. आज साधनांची रेलचेल आहे. पण समाधान मात्र कमी होत चालले आहे.
पूर्वी ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तक शोधावे लागायचे. आज ज्ञान हातातल्या मोबाइलमध्ये आहे. पण विचार करण्यासाठी मनातली शांतता आहे का? खरा विकास कदाचित इथेच थांबतो. भौतिक विकास आपल्याला सुविधा देतो. तांत्रिक विकास आपला वेळ वाचवतो. वैद्यकीय विकास आपले आयुष्य वाढवतो. शैक्षणिक विकास आपल्याला माहिती देतो. पण सामाजिक विकास आपल्याला माणूस बनवतो आणि बौद्धिक विकास आपल्याला विचार करणारा माणूस बनवतो.
आपण पहिल्या प्रकारच्या विकासात खूप पुढे आलो आहोत, पण दुसर्या दोन प्रकारांचा वेग तितका आहे का? चहाचा शेवटचा घोट घेत मित्र म्हणाला, म्हणजे तुझ्या मते विकास झालाच नाही? मी म्हणालो, की झाला आहे. प्रचंड झाला आहे. प्रश्न विकास झाला की नाही हा नाही.
प्रश्न एवढाच आहे की, आपल्या साधनांचा विकास झाला, पण साधनांचा वापर करणार्या माणसाचा किती विकास झाला? दोघेही काही क्षण शांत राहिलो. चहाची टपरी गजबजलेली होती. प्रत्येकाच्या हातात मोबाईल होता. अनेक चेहरे स्क्रीनमध्ये हरवले होते. आणि मला पुन्हा तोच प्रश्न पडला, विकास कुठे आहे?
Where is the development?