– मुकुंद बाविस्कर
स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात आपल्या खास शैलीने छाप पडणारे आणि कृषी, सहकार, वनसंवर्धन, ग्रामविकास, साहित्य व सामाजिक क्षेत्रात ठसा उमटविणारे माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील हे नाशिक जिल्ह्यातील आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या वनाधिपती विनायकदादा पाटील प्रतिष्ठानमार्फत आगामी काळात विविध उपक्रम राबवून त्यांचा वारसा जपण्याचे काम होणार आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात वेगवेगळी खाती सांभाळताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. निफाड तालुका पंचायत समिती सभापती, निफाडचे आमदार, कुंदेवाडी विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. राज्यमंत्रिपदाच्या दर्जासह त्यांना महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही पाच वर्षे देण्यात आले होते. त्यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले होते. ‘पुलोद’ मंत्रिमंडळात शरद पवार यांचे ते सहकारी होते.
विशेषतः साहित्य क्षेत्रातही त्यांचा व्यासंग मोठा होता आणि त्यांनी लेखक म्हणूनही लौकिक संपादन केला होता. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक अशा त्यांच्या या प्रयोगाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली गेली. त्यासाठी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ’बायफ’ संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करताना आदिवासी भागात आंबा, काजू, करवंद लागवड व विक्री यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. यासह आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील 11 विधवांंना विशेष मदत करून नवजीवन प्रकल्प त्यांनी राबविला. विशेषतः वृक्षलागवड क्षेत्रातील त्यांच्या उल्लेेखनीय कार्याबद्दल कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी त्यांना वनाधिपती हे उपाधी देऊन सन्मानित केले होते. महत्त्वाचे म्हणजे, अनेक वर्षे विनायकदादांचे नाशिक शहरात वास्तव्य असल्याने विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग-व्यवसाय विशेषतः सांस्कृतिक-साहित्यिक आणि कृषी संबंधित कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता किंबहुना अनेकांना त्यांचे मार्गदर्शन मिळत होते. मात्र, जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या निफाड तालुक्याशी त्यांची नाळ जोडलेली होती.
विनायकदादा यांना जाऊन आता सुमारे सहा वर्षांचा कालावधी उलटला. मात्र, त्यांच्या कार्याचाही लोकांमध्ये ठसा कायम आहे. साहजिकच त्यांच्या विविध क्षेत्रांतील कार्याचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी निफाड तालुक्यात विनायकदादा पाटील प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. या प्रतिष्ठानमार्फत विविध क्षेत्रांत कार्य सुरूच राहणार आहे. गेल्या आठवड्यात निफाड येथील उपबाजार आवारात ’विनायकदादा पाटील प्रतिष्ठान’चा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. निफाड ही न्यायमूर्ती रानडे यांची भूमी असून, त्यांनी वैचारिक वारसा जपला. विनायकदादा पाटील यांनी तो कार्यवारसा पुढे नेण्याचे काम केले. विनायकदादांचे कार्य नवीन पिढीला समजावे आणि त्यांच्या विचारांचा गौरव व्हावा, या उद्देशाने या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, विनायकदादा हे कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम असला, तरी प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित राहत. नाशिकचे पालक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. खासदार भास्कर भगरे यांनी सांगितले की, विनायकदादांनी निफाड तालुक्याच्या विकासाला चालना दिली. हे प्रतिष्ठान त्यांच्या नावाने स्थापन होणे म्हणजे त्यांच्या कार्याचा केलेला गौरव आहे. आमदार दिलीप बनकर यांनी सांगितले की, विनायकदादा म्हणजे चालतेबोलते व्यासपीठ आणि सर्वांना आधार देणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी तालुक्याला नवी दिशा देण्याचे काम केले. विनायकदादा पाटील आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत होती. डॉ. हर्षाली पाटील यांनी वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष वि. दा. व्यवहारे यांनी स्पष्ट केले की, दादांच्या शेती तथा कृषिविषयक, तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्य पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वि. दा. व्यवहारे, राजाभाऊ शेलार, राजेंद्र राठी, अनिल पाटील कुंदे, शिवाजीराजे ढेपले, वैकुंठ पाटील, तुकाराम कर्डेल, विजय निपाणेकर, प्रा. मधुकर माळी आणि संदीप शिंदे आदी प्रतिष्ठानच्या कार्यात सहभागी झाले आहेत. या प्रतिष्ठानमार्फत त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा असाच पुढे जात राहील, असा विश्वास व अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहेत.
तीन दिवसीय महाकुंभ भक्तिसंगम सोहळा रंगला :
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे ठक्कर डोम येथे झालेल्या तीन दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्तिसंगम कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्ते, पायाभूत सुविधा तसेच भाविकांसाठी आवश्यक विविध नागरी सुविधा विकसित करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्वांच्या सहकार्याने कुंभमेळ्याची तयारी दर्जेदार, पारदर्शक पद्धतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण करून हा कुंभमेळा सुरक्षित, सुव्यवस्थित आणि यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांची आवश्यकता भासणार असल्याने प्राधिकरणामार्फत ‘कुंभदूत’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यापक आयोजनात तरुणांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे, या महाकुंभ भक्तिसंगम सोहळ्यात भक्तिगीत, चर्चासत्र, परिसंवाद यांसह अनेक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दुर्मिळ व ऐतिहासिक छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद :
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारित दुर्मिळ आणि ऐतिहासिक छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन झाले. हे प्रदर्शन ’रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स’ आणि ’नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदक्षिणा हॉलमधील डॉ. सुनंदा म. गोसावी आर्ट गॅलरी, नाशिक येथे घेण्यात आले होते. या प्रदर्शनात 1932 पासूनच्या कुंभमेळ्यांची दुर्मिळ व अप्रकाशित छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. चित्रित विषय : साधू-संतांचे आखाडे, शाहीस्नान, धार्मिक विधी, बदलते नाशिक, भाविकांची गर्दी आणि कुंभमेळ्याचे बदलते स्वरूप या विषयांचा ऐतिहासिक ठेवा छायाचित्रांच्या माध्यमातून पाहायला मिळला. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, महंत आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कचर्याच्या ढिगार्यापासून 42 हजार देशी झाडांची निर्मिती :
देवळाली कॅन्टोन्मेंट परिसरातील एका उजाड व कचरा डेपोच्या 1.40 हेक्टर (सुमारे पाच एकर) जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागाच्या तीन महिला अधिकार्यांच्या जिद्दीमुळे 42 हजार देशी झाडांंचे घनदाट ‘जीवनवन’ साकारले आहे. वर्षानुवर्षे साचलेला प्लास्टिक आणि घरगुती कचरा हटवून, त्या जागेचे निसर्गरम्य वनात रूपांतर करण्यात आले आहे. कचरा हटवून जमिनीची मशागत, साचलेल्या कचर्याची योग्य विल्हेवाट लावून जमिनीचे एक मीटर खोलीपर्यंत उत्खनन करण्यात आले. मृत मातीत सेंद्रिय शेणखत, भाताचे तूस आणि कंपोस्ट खत मिसळून तिची सुपीकता परत मिळवण्यात आली. जपानी ‘मियावाकी’ तंत्रज्ञानाचा वापर करून 40 हजारांहून अधिक देशी प्रजातींची 42 हजार रोपे लावण्यात आली. भटक्या जनावरांपासून संरक्षणासाठी तारांचे कुंपण आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी ठिबक सिंचन व्यवस्था उभारण्यात आली आहे. दूषित द्रवांमुळे होणारे जलप्रदूषण थांबले असून, स्थानिक जैवविविधता, पक्षी-पाखरांना अधिवास, भूजल पुनर्भरण आणि तापमान नियंत्रणास मोठी मदत होत आहे.
The Vanadhipati Vinayakdada Patil Pratishthan has taken up the mantle and legacy of Dada’s work.