सर्वसंमतीने ‘नवी दिल्ली घोषणापत्र’ स्वीकारले

ब्रिक्स शिखर परिषदेचा यशस्वी समारोप : घोषणापत्रासह चीनकडे सोपवले पुढील यजमानपद

नवी दिल्ली : प्रतिनिधी
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने यशस्वी समारोप झाला. दोन दिवस चाललेल्या या महत्त्वपूर्ण जागतिक विचारमंथनानंतर सर्वसंमतीने ‘नवी दिल्ली घोषणापत्र’ स्वीकारण्यात आले. पर्यावरण आणि विकास हे एकमेकांशी विसंगत नसून, परस्परांना पूरक असल्याचे सांगत पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीतील ‘प्रकृती हीच माता’ या विचारसरणीचा दाखला दिला. परिषदेची सांगता झाल्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपापल्या देशांकडे रवाना झाले. भारताच्या यशस्वी अध्यक्षतेनंतर ब्रिक्सच्या पुढील यजमानपदाची धुरा आता चीनकडे सोपवण्यात आली असून, पंतप्रधान मोदींनी चीनला आगामी अध्यक्षतेसाठी शुभेच्छा दिल्या.
समारोपीय भाषणात पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, ब्रिक्स हा केवळ देशांचा एक समूह नसून, जागतिक समस्यांवरील ठोस उपायांची एक भक्कम कार्यप्रणाली (इकोसिस्टम) आहे. ब्रिक्स आता आपल्या स्थापनेच्या तिसर्‍या दशकात पदार्पण करत आहे; त्यामुळे जगाला आता केवळ चर्चा आणि आश्वासनांची नव्हे, तर जमिनीवर दिसणार्‍या ठोस परिणामांची अपेक्षा आहे. परिषदेत ठरवण्यात आलेली सर्व धोरणे आणि फ्रेमवर्क केवळ कागदोपत्री न राहता, सर्व देशांनी निश्चित कालमर्यादेत एकत्र येऊन सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ब्रिक्समधील ’ग्लोबल साऊथ’च्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना पंतप्रधानांनी सांगितले की, विकसनशील देशांचा ब्रिक्सवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. येथे प्रत्येक देशाचा आवाज ऐकला जातो, त्यांच्या अनुभवांचा आदर केला जातो आणि केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर त्यांच्या सहभागाने उपाय शोधले जातात. सदस्य देशांची भौगोलिक आणि राजकीय पार्श्वभूमी भिन्न असली तरी ही विविधताच ब्रिक्सची खरी ताकद असून, परस्पर सहकार्याच्या बळावरच संपूर्ण मानवतेचा विकास शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
पर्यावरण – विकास एकमेकांना पूरक
पर्यावरण आणि विकास हे एकमेकांशी विसंगत नसून परस्परांना पूरक असल्याचे सांगत पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीतील ’प्रकृती हीच माता’ या विचारसरणीचा दाखला दिला. मानव विकास आणि पर्यावरण संवर्धन यांच्यात समतोल राखण्यासाठी भारताने स्वच्छ ऊर्जा, स्मार्ट ग्रीड आणि एनर्जी स्टोरेजसाठी ’ब्रिक्स डिजिटल सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन केले आहे. याशिवाय, पारंपारिक शेती ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालण्यासाठी ’ग्रो-इकोलॉजी अँड रिजनरेटिव्ह ग्रिकल्चर सेंटर ऑफ एक्सलन्स’ची निर्मिती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांपर्यंत

जागतिक तणाव, साथीचे रोग आणि हवामान बदलांमुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीत येणारे अडथळे दूर करण्यावर भारताने विशेष भर दिला. संसर्गजन्य आजारांची वेळेत माहिती मिळण्यासाठी ’ब्रिक्स इंटिग्रेटेड अर्ली वॉर्निंग सिस्टम’वर एकमत झाले असून, आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष डेटा मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, पुरवठा साखळी अधिक लवचिक आणि विश्वासार्ह करण्यासाठी लॉजिस्टिक फ्रेमवर्क तयार करण्यात आले आहे. तंत्रज्ञान आणि दुर्मीळ खनिजांचे शस्त्रीकरण जागतिक प्रगतीला मारक ठरू शकते, असा इशारा देत तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिनपिंग स्नेहभोजनास अनुपस्थित
पंतप्रधान मोदींनी सर्व ब्रिक्स नेत्यांसाठी आयोजित केलेल्या विशेष स्नेहभोजनाला (गॅला डिनर) मात्र शी जिनपिंग अनुपस्थित राहिले. त्यांच्या या गैरहजेरीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी, यामागे कोणतेही राजकीय कारण नसून, केवळ थकवा हेच प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनहून भारतापर्यंतचा दीर्घ प्रवास, दोन्ही देशांच्या वेळेतील फरक आणि संमेलनासह द्विपक्षीय बैठकीचे अत्यंत व्यस्त वेळापत्रक यामुळे जिनपिंग यांना प्रचंड थकवा जाणवत होता.

‘New Delhi Declaration’ adopted by consensus.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *