भविष्यात ‘एआय’ उठणार माणसाच्या जीवावर?

कमांड न स्वीकारता स्वतःच्या बुद्धीने घेणार निर्णय; मानवी अस्तित्वाला धोक्याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत आहे, तसतशी एका मोठ्या धोक्याची घंटा वाजू लागली आहे. ’अँथ्रोपिक’ या आघाडीच्या एआय कंपनीतील काही प्रमुख संशोधकांनी गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, भविष्यात एआय माणसांसाठी विनाशकारी ठरू शकते आणि मानवी अस्तित्वालाच धोका निर्माण करू शकते. हे तंत्रज्ञान केवळ एक साधन न राहता स्वतःची बुद्धिमत्ता वापरून निर्णय घेण्याची क्षमता विकसित करत आहे, ज्यामुळे ते भविष्यात माणसाच्या जीवावर उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या एआय कंपन्यांमध्ये स्वतःहून अधिक प्रगत आणि विकसित होणारे (सेल्फ-इम्प्रूव्हिंग) मॉडेल्स तयार करण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतून असे तंत्रज्ञान जन्माला येऊ शकते, जे पूर्णपणे मानवी नियंत्रणाबाहेर जाईल आणि माणसाने दिलेली कोणतीही ’कमांड’ किंवा आदेश स्वीकारण्यास नकार देईल. याच ’आउट ऑफ कंट्रोल’ होण्याच्या वाढत्या भीतीपोटी अँथ्रोपिकमधील काही संशोधकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या मते, तंत्रज्ञानाने एकदा नियंत्रणाची पातळी ओलांडली, तर ते थांबवणे मानवाच्या आवाक्याबाहेरचे असेल.
एलन मस्कचा ’सायऑप’चा दावा
एकीकडे एआय संशोधक इतकी मोठी भीती व्यक्त करत असताना, दुसरीकडे अब्जाधीश एलन मस्क आणि काही तज्ज्ञांनी या दाव्यांवर थेट शंका उपस्थित केली आहे. मस्क यांनी या इशार्‍यांना ’सायऑप’ (मानसिक खेळ) आणि एक पूर्वनियोजित ’सेटअप’ म्हटले आहे. त्यांच्या मते, एआय कंपन्या स्वतःच्याच उत्पादनांबद्दल जाणीवपूर्वक अशी भीती पसरवून एक वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी मिळवण्याचा किंवा बाजारात भीतीचे वातावरण निर्माण करून स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Will AI pose a threat to human life in the future?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *