नाशिकमध्ये झेंडू, शेवंतीची आवक चौपट, ग्राहकांना दिलासा
नाशिक : प्रतिनिधी
सण-उत्सव म्हटले की, देवपूजेपासून ते घराच्या सजावटीपर्यंत फुलांना मागणी असते. गौरी-गणपती उत्सवात फुलांची मागणी अधिक वाढल्याचे चित्र आहे; परंतु सध्या पावसाचे संतुलित प्रमाण पाहता शेतकर्यांनी झेंडू, शेवंतीची लागवड चौपट केल्याने दर कोसळले आहेत. परिणामी ग्राहकांना दिलासा, तर शेतकर्यांना फुले रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.
नाशिक जिल्ह्यात फुलशेतीचे क्षेत्र झपाट्याने वाढत असून, शेतकरी आता नवनवीन प्रयोग करत आहेत. पूर्वी फुलांचे उत्पादन नाशिकपासून अवघ्या 30 किलोमीटरच्या परिसरात म्हणजेच मोहाडी, सुकेणे या भागात घेतले जायचे. मात्र, आता चांदवड, कळवण व सिन्नर या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर फुलांची लागवड केली जात आहे. या वाढलेल्या लागवडीमुळे बाजारात झेंडू व शेवंतीची आवक नेहमीपेक्षा चौपट झाली आहे.
नाशिकमधील फुलांच्या उत्कृष्ट दर्जा (क्वालिटी)मुळे केवळ स्थानिकच नव्हे, तर मुंबई, सुरत, अहमदाबाद या मोठ्या बाजारपेठांसह शेजारचे जिल्हे (नंदुरबार, धुळे) आणि गुजरातच्या वापी, वलसाड तसेच डहाणू, पालघर येथील व्यापारीही नाशिकमध्ये फुले खरेदी करण्यासाठी येतात.
झेंडू आणि शेवंतीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने त्यांचे दर प्रचंड कोसळले आहेत. फुलांचे दर हे दररोज बदलणारे असल्याने काल 20-30 आणि 40-50 रुपये किलोने विकला जाणारा झेंडू थेट दहा रुपये किलोवर आला आहे. सणासुदीच्या काळात झेंडू व शेवंती सवार्ंत जास्त लागते. ते स्वस्त झाल्यामुळे लोक तीच फुले खरेदी करत आहेत. त्याचा थेट परिणाम इतर फुलांच्या दरांवरही होऊन तेदेखील कमी झाले आहेत. गुलाबाच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. खुल्या शेतीतील गुलाब 20 रुपये डझन या दराने विकला जात आहे. पॉलिहाउसमध्ये पिकवला जाणारा आणि पुठ्ठ्यात पॅक केलेला (20 फुलांचा बॉक्स) गुलाब 200 ते 300 रुपये डझन या दराने उपलब्ध आहे. गौरी-गणपतीच्या सणानिमित्त फुलांचे दर सर्वसामान्यांच्या अगदी आवाक्यात असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे अपेक्षित दर मिळत नसल्याने आणि लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. काही शेतकर्यांनी उद्विग्न होऊन रस्त्यावर झेंडूची फुले फेकून दिल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
असे आहेत दर
झेंडू 100 ते 150 रुपये क्रेट्स
गुलाब 40 ते 80 रुपये डझन
शेवंती 100 ते 120 रुपये
मोगरा एक हजार ते 1,200 रुपये किलो
पत्री जुडी 10 रुपये
केवडा 5 ते 10 रुपये
लिली बंडल 50 ते 60 रुपये
नाशिकच्या फुलबाजारात यंदा झेंडू व शेवंतीच्या आवकेत मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल चौपट वाढ झाली आहे. वाढत्या लागवडीमुळे बाजारात फुलांचा महापूर आला असून, दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे गौरी-गणपतीच्या सणात सर्वसामान्य व मध्यमवर्गीय ग्राहकांना स्वस्तात फुले उपलब्ध होणार असली, तरी अत्यल्प भावामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकर्यांवर रस्त्यावर फुले ओतून देण्याची वेळ आली आहे.
– राहुल सोनवणे, फूल विक्रेते
Demand for flowers has increased for Gauri-Ganpati.