नाशिकमध्ये गणेशोत्सवासाठी चोख पोलीस बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक अधिकारी, अंमलदार, पोलीस तैनात

सिडको : प्रतिनिधी
नाशिक शहरात 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि निर्विघ्न वातावरणात पार पडावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी नाशिक शहर पोलिसांनी व्यापक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गणेश मंडळे, प्रमुख विसर्जन मार्ग, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील परिसरांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी व अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर गृहरक्षक दल, नवप्रविष्ट पोलीस शिपाई, प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि वॉर्डन यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध भागांवर सतत नजर ठेवण्यात येणार आहे.

विशेष पथके सज्ज
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी दंगल नियंत्रण पथक, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स, राज्य राखीव पोलीस दल, दहशतवाद विरोधी पथक, गुन्हे शाखेचे स्ट्राइकिंग फोर्स, जलद प्रतिसाद पथक, तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथके तैनात करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त व विशेष पथकेही सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात दहशतवादविरोधी शाखा आणि गुन्हे शाखेच्या पथकांकडून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. समाजविघातक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर विशेष निगराणी ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तींच्या हालचालींवरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे. गणेश मंडळे, प्रमुख विसर्जन मार्ग, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे.
शहरात नियमित गस्तही वाढविण्यात येणार आहे. परिस्थितीनुसार स्ट्राइकिंग फोर्स, दंगल नियंत्रण पथक,आणि यांचा तातडीने वापर केला जाणार आहे.

नागरिकांना निर्भयपणे उत्सव साजरा करण्याचे आवाहन

नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव असल्याने सर्व गणेश मंडळे, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

कायदा मोडणार्‍यांवर कठोर कारवाई

सार्वजनिक शांतता भंग करण्याचा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणार्‍यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Tight police security in Nashik for Ganeshotsav.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *