टायर फुटला अन् मिक्सर एसटीवर आदळला

दातली फाट्यावर 6 जखमी; 57 प्रवासी थोडक्यात बचावले

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर-शिर्डी महामार्गावरील दातली फाट्यावर मंगळवारी (दि.15) सायंकाळी 4.50 वाजेच्या सुमारास एसटी बस आणि टी.एम. मिक्सरची जोरदार धडक झाली. मिक्सरचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. मिक्सर दुभाजकातील गॅपमधून विरुद्ध दिशेने जात समोरून येणार्‍या एसटी बसवर आदळला. या अपघातात सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यात चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बसमधील 57 प्रवासी दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने बचावले.
सिन्नर आगाराची सिन्नर-सोमठाणे बस (एमएच 14 एचजी 8293) 57 प्रवाशांना घेऊन सोमठाण्याकडे जात होती. सायंकाळी 4.50च्या सुमारास दातली फाट्याजवळ समोरून सिन्नरच्या दिशेने येणार्‍या टी.एम. मिक्सरचा (एमएच 15 जेडब्ल्यू 2046) टायर फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून मिक्सर दुभाजकातील गॅपमधून दुसर्‍या बाजूला गेला आणि एसटी बसच्या चालकाच्या बाजूला
घासत धडकला.
अपघाताची माहिती मिळताच सिन्नर आगार व्यवस्थापक सविता काळे, वाहतूक निरीक्षक उदय सानप, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील बडगुजर, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांच्यासह पोलिस व एसटी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. एसटी प्रशासनाकडून जखमींना प्रत्येकी एक हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली. आगार व्यवस्थापक सविता काळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
दरम्यान, आमदार माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांनी फोनवरून जखमींची विचारपूस केली. तर नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे यांनी रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली.

A tyre burst, and the mixer truck crashed into the ST bus.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *