सिन्नर : प्रतिनिधी
गणपतीची मूर्ती मोठी बनवण्याची स्पर्धा सुरू असताना सिन्नरच्या एका कलाकाराने मात्र पाव इंचाच्या बाप्पाला आकार देत 50 हजार मूर्तींचा संग्रह उभा केला आहे. संजय क्षत्रिय यांनी तब्बल 30 वर्षांच्या मेहनतीत शाडू माती आणि डिंकापासून या सूक्ष्म गणेशमूर्ती साकारल्या. पत्नी वंदना आणि मुली पूजा, अक्षदा यांच्या सहकार्याने सुरू असलेली ही कला आता 51 हजार मूर्तींच्या संकल्पाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
वयाच्या 22व्या वर्षी रंगकाम करताना क्षत्रिय यांनी छोटी गणेशमूर्ती पाहिली. त्यातूनच मोठ्या मूर्तींपेक्षा सूक्ष्म गणेशमूर्ती साकारण्याची कल्पना सुचली. नववीपर्यंत शिक्षण झालेल्या क्षत्रिय यांनी सुरुवातीला व्हाइटिंग पावडर व डिंकापासून तीन इंचाच्या सुमारे एक हजार मूर्ती तयार केल्या. कौतुक झाल्यानंतर हा छंदच त्यांची ओळख बनला.
पाव इंचापासून तीन इंचांपर्यंतच्या या मूर्तींमध्ये त्रिमुखी, पंचमुखी, नखावर बसलेला गणपती, सुपारीवरील गणेश, बाटलीतील बाप्पा यांसह वाघ, उंदीर व मोरावर विराजमान गणेशाच्या 100 हून अधिक रूपांचा समावेश आहे. 51 लहान हत्तींचा संग्रह आणि दहा थरांची दहीहंडीही त्यांनी साकारली आहे.
काड्या, कापूस, साबुदाण्यांतून
मंदिरांची निर्मिती
गणेशमूर्तींसोबतच क्षत्रिय यांनी विविध मंदिरांच्या सूक्ष्म प्रतिकृती तयार केल्या आहेत. एक लाख आगपेटीच्या काड्यांपासून सिद्धिविनायक मंदिर, 11 किलो कापसापासून अक्षरधाम, 25 किलो साबुदाणा व फेव्हिकॉलपासून ताजमहाल, दोन लाख सुवर्णमण्यांपासून सुवर्णमंदिर आणि खडूंपासून अयोध्येतील राम मंदिर त्यांनी साकारले आहे. 12 ज्योतिर्लिंगांसह 51 मंदिरांच्या प्रतिकृती त्यांच्या संग्रहात आहेत.
Sanjay Kshatriya’s Passion: 50,000 Idols Created Over 30 Years