गणेशोत्सवातही परिसरात कचरा अन् बांधकाम साहित्याचा खच
मालेगाव : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले असतानाही सदर बाजारातील गूळ बाजार परिसरात रस्त्यालगत कचरा, बांधकाम साहित्य तसेच सिमेंट व खडीचे अवशेष पडून असल्याने अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी शुक्रवारी (दि. 18) सकाळी गूळ बाजार परिसरात आंदोलन केले.
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी महापालिकेत झालेल्या बैठकीत उत्सव काळात नागरिकांना तक्रारीची गरज भासणार नाही, अशी भूमिका प्रशासनाकडून मांडण्यात आली होती. स्वच्छता, रस्त्यांची कामे, पथदीप दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याबाबतही आश्वासन देण्यात आले होते. मात्र, गूळ बाजार परिसरातील रस्त्याचे काम पूर्ण होऊन सुमारे महिनाभराचा कालावधी उलटला असतानाही रस्त्यालगतचे बांधकाम साहित्य व कचरा हटविण्यात आलेला नसल्याचा आरोप बोरसे यांनी केला.
रस्त्यावर साचलेली बारीक खडी, सिमेंटचे अवशेष आणि धुळीमुळे दुचाकीस्वारांना घसरण्याच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले. एका बाजूला कचर्याचे ढीग, तर दुसरीकडे खड्डे आणि बांधकाम साहित्य अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका कर्मचार्यांकडे तक्रार केल्यानंतर ‘हे काम आमचे नाही’ असे सांगण्यात येत असल्याचा आरोपही बोरसे यांनी केला. मग या कामाची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आंदोलनाची माहिती मिळताच महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (स्वच्छता) अनिल पारखे, स्वच्छता निरीक्षक इकबाल अहमद, उपअभियंता एस. टी. चौरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आयुक्त रवींद्र जाधव किंवा उपायुक्तांनी स्वतः घटनास्थळी येऊन पाहणी करावी, अशी मागणी बोरसे यांनी केली. संबंधित अधिकारी येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका
त्यांनी घेतली.
या आंदोलनाला मध्यवर्ती गणेशोत्सव समितीने पाठिंबा दिला. समितीचे अध्यक्ष राहुल बच्छाव यांच्यासह पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ तसेच ‘महानगरपालिकेचा निषेध असो’ अशा घोषणा
देण्यात आल्या.
आवश्यक ती कार्यवाहीचे आश्वासन
तहसीलदार विशाल सोनवणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांची भूमिका जाणून घेतली. प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांनी रस्त्यालगतचा कचरा व बांधकाम साहित्य हटविले. तसेच रस्त्यावर पाणी मारून परिसर स्वच्छ करण्याचे आश्वासन देण्यात आले.
Protest against the lack of cleanliness in the jaggery market area of Malegaon.