‘पोेर्टा केबिन’मधून मिळणार शिक्षणाचे बाळकडू

सव्वा कोटीचा खर्च, चार ठिकाणचा प्रस्ताव

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील महापालिकेच्या काही शाळांत वर्गखोल्या अपुर्‍या पडत असल्याने मनपा शिक्षण विभागाने महासभेकडे पोर्टा केबिन उभारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. एकूण चार ठिकाणी हायटेक पोर्टा केबिनमध्ये मुलांकडून शिक्षणाचे धडे गिरवले जाणार आहेत. यासाठी एक कोटी 12 लाखांचा खर्च येणार आहे.
वाढत्या पटसंख्येमुळे सध्या अनेक शाळांत दोन सत्रांमध्ये वर्ग भरवावे लागत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीवर ताण येत असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान 2026-27 अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात या हायटेक वर्गखोल्या तयार केल्या जाणार आहेत. यात पंचवटी विभागातील मनपा शाळा क्रमांक 16 (अश्वमेधनगर) येथे एक वर्गखोली, सातपूर विभागातील शाळा क्रमांक 97 (कामगारनगर) येथे एक वर्गखोली आणि सिडको विभागातील शाळा क्रमांक 79 (घरकुल चुंचाळे शिवार) येथे दोन वर्गखोल्या उभारण्याचे प्रस्तावित आहे. महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि अपुर्‍या वर्गखोल्यांमुळे उद्भवणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जागाटंचाई, एफएसआयची मर्यादा व नियमित वर्गखोल्यांच्या बांधकामातील तांत्रिक अडचणी लक्षात घेता, मनपाच्या तीन शाळांत आधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त अशा चार पोर्टा केबिन (प्री-फॅब्रिकेटेड) वर्गखोल्या उभारण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकार्‍यांकडून संबंधित प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता आणि शासन निधी उपलब्ध झाल्यानंतर निविदा प्रक्रियेद्वारे हे काम पूर्ण केले जाईल. या निर्णयामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि डिजिटल युगाला साजेसे शैक्षणिक वातावरण मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

आधुनिकतेचा टच

पोर्टा केबिन वर्गखोल्या 20 बाय 20 फूट आकाराच्या असतील आणि त्यात विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासपूरक वातावरण निर्माण केले जाईल. सीसीटीव्ही कॅमेरे, वातानुकूलित यंत्र, पाचशे लिटरची पाण्याची टाकी, वॉटर कूलर, ग्रीन नोटीस बोर्ड, एलईडी लाइट्स, सीलिंग फॅन, डस्टबिन, ग्रील आणि कॅनोपीसह खिडक्या तसेच आकर्षक शैक्षणिक विनाइल प्रिंटिंग, अशा सर्व अत्याधुनिक सुविधा पुरवल्या जातील.

‘Porta-cabins’ to provide the foundation of education

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *