46 अभियंत्यांचा भार अवघ्या 20 जणांवर
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील पाणीपुरवठ्यावरून प्रत्येक महासभेत नगरसेवकांकडून प्रशासनाचा पंचनामा केला जात आहे. मात्र, अद्याप शहरातील पाण्याची परिस्थिती सुधारत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महपालिकेत अभियंत्यांच्या 110 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. परंतु 14 अभियंत्यांनाच या विभागात नियुक्ती देण्यात आली. परिणामी या विभागात मनुष्यबळाची तूट जैसे थे आहे. तसेच 46 अभियंत्यांचा भार अवघ्या 20 जणांवर असल्याने काम करताना मोठी कसरत या विभागाला करावी लागत आहेत.
शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या महासभेत सिडकोतील नगरसेवकांनी पाण्यावरुन तीव्र संताप व्यक्त केला. दररोज कमी दाबाने पाणीपुरवठा, अनियमित पाणी, जलवाहिनी गळती, पाणीटंचाई तसेच विविध भागांतील तांत्रिक अडचणींचे प्रश्न सदस्यांकडून उपस्थित केले जातात. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केवळ नवीन अभियंत्यांची नियुक्ती करून भागणार नसून, मंजूर पदांनुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे. विशेषतः प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणार्या बिगारींची संख्या अत्यल्प असल्याने दुरुस्ती आणि देखभाल कामांवरही त्याचा परिणाम होतो. महापालिकेत नव्याने भरती झालेल्या कनिष्ठ अभियंत्यांपैकी 14 अभियंत्यांचे पाणीपुरवठा विभागासाठी वाटप करण्यात आले आहे. उर्वरित अभियंत्यांचे इतर विभागांमध्ये वाटप करण्यात येत आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागातील मंजूर पदांच्या तुलनेत विद्यमान कर्मचारीसंख्या अद्याप मोठ्या प्रमाणात अपुरी दिसत आहे.
सिंहस्थापूर्वी परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्याचे दिव्य महापालिकेसमोर असणार आहे. सध्या अमृतअंतर्गत शहरातील जलवाहिन्यांच्या विस्ताराचे काम सुरू आहे. यानंतर पाणीपुरवठ्याचा प्रश्न यामुळे सुटणार आहे. पण यासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ असल्याशिवाय पर्याय नसेल. ही बाब प्रशासनाला ध्यानात घ्यावी लागेल.
Water supply hit by staff shortage