महिला मंडळ चौथ्या वर्षात; वादळातही विझली नाही गणेशोत्सवाची ज्योत
सटाणा : तालुका प्रतिनिधी
पहिल्याच वर्षी मुसळधार पाऊस, वादळ आणि कोसळलेला मंडप… गणरायाची मूर्तीही पावसाने ओली झाली. मात्र, या संकटाने महिलांचा उत्साह खचला नाही. उलट बालगोपाळांच्या आनंदासाठी सुरू केलेला गणेशोत्सव कोणत्याही परिस्थितीत अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला. याच जिद्दीतून उभे राहिलेले शहरातील चौगाव रस्त्यावरील भिवसननगर येथील सर्वेश्वरी सामाजिक महिला गणेश मंडळाने आज चौथ्या वर्षात पदार्पण केले.
यंदा बागलाणचे आराध्य दैवत संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या 211 व्या जन्मोत्सवानिमित्त महाराजांच्या चरणी 56 प्रकारच्या पक्वान्नांचा ‘छप्पन भोग’ महानैवेद्य अर्पण करण्यात आला. सायंकाळी झालेल्या या भक्तिमय सोहळ्यास भाविकांची गर्दी झाली. शिवसेनेचे युवा नेते आविष्कार भुसे, लोकनियुक्त नगराध्यक्षा हर्षदा पाटील, ‘सनपा’तील शिवसेना गटनेते राहुल पाटील यांच्या हस्ते श्री गणरायासह देवमामलेदार यशवंतराव महाराजांची महाआरती करण्यात आली.
कार्यक्रमात मधुर अमृतकार या चिमुकल्याने साकारलेली देवमामलेदारांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरली. मंडळात अध्यक्षा माधुरी अमृतकार, उपाध्यक्षा सविता आहिरे, खजिनदार मालती सोनवणे, सदस्या छाया देवरे, अनिता शेवाळे, रेवती नेरकर, शोभा नेरकर, अनिता नेरकर, संगीता खानकरी, वैशाली वाघचौरे, कोमल बाविस्कर, अनिता चव्हाण, प्रतिभा बच्छाव, अर्चना सोनवणे, क्युरी पडालिया, अनिता आहिरे, रंजना परदेशी, बबिता मोरे, वनिता आहिरे, जयश्री नेरकर, वैशाली शिरोडे, रेणुका चव्हाण, सविता मोरे, पल्लवी शेवाळे, ज्योती खैरनार आदी महिलांचा सहभाग आहे.
बालगोपाळांच्या आनंदासाठी महिलांना एकत्र करून गणेशोत्सव सुरू केला. पहिल्याच वर्षी पाऊस, वादळात मंडप कोसळून गणरायाची मूर्ती ओली झाली; मात्र या संकटाने जिद्द वाढली. काहींचा विरोधही झाला, पण न डगमगता उत्सव सुरू ठेवला. चौथ्या वर्षीही तो अविरत सुरू असल्याचे समाधान आहे.
– माधुरी अमृतकार, अध्यक्षा
Grand offering of ‘Chhappan Bhog’ to Devmamledar at Satana.