बाप्पांना निरोप देताना मनमाडकर गहिवरले

गणेशाचे उत्साही वातावरणात विसर्जन, कृत्रिम तलावाची व्यवस्था

मनमाड : प्रतिनिधी
श्री गणेशाचे विसर्जन मनमाड शहरात मोठ्या धामधुमीत, उत्साहात आणि धार्मिक वातावरणात झाले. बाप्पांना निरोप देताना मनमाडकर गहिवरले होते. सकाळपासूनच घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. पारंपरिक पोशाखात शहरवासीय बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्त्यांवर उतरले होते.
शहरातील मुख्य गणेशकुंडाखेरीज मनमाड नगरपरिषदेच्या वतीने कॅम्प परिसर, सावरकरनगर, हुडको, खाकी बाग, विवेकानंदनगर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करून विसर्जनाची सोय केली होती. यासाठी नगरपरिषदेतर्फे 140 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने विभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित आणि पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे, शेवटच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत नगराध्यक्ष योगेश पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी व पोलीस निरीक्षक विजय करे गणेशकुंडावर दिवसभर हजर होते. नांदगाव येथील एक महाकाय गणेशमूर्तीसुद्धा विसर्जनासाठी मनमाड शहरात आली होती, जिचे विसर्जन गणेशकुंडावरच करण्यात आले.
नगरपरिषदेतर्फे विसर्जन मार्गाची दुरुस्ती करण्यात आली होती. तसेच गणेशकुंड व विसर्जन मार्गावर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. कुंडावर निर्माल्य संकलनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीत व्यसनविरोधी प्रबोधन करण्यात आले आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक पार पडली. यानंतर अनेक सार्वजनिक मंडळांनी वाजतगाजत बाप्पांचे विसर्जन केले. विसर्जन मिरवणुकीत पुरुषांबरोबरच महिलांची संख्या लक्षणीय होती. नगरपरिषदेच्या वतीने गणेशकुंडावर सार्वजनिक गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कारही करण्यात आला. शहरात डीजेविरोधी जनजागृती करण्याचा समाजसेवकांनी प्रयत्न केला; परंतु तो पूर्णपणे यशस्वी होऊ
शकला नाही.

Residents of Manmad were overcome with emotion while bidding farewell to Bappa.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *