पोलिसाला बोनेटवर नेले फरपटत; गुन्हा दाखल

नाशिकरोडच्या दत्तमंदिर सिग्नलवरील थरार

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
दत्तमंदिर सिग्नलवर वाहतुकीचे नियम मोडून भरधाव कार चालवणार्‍या बावीसवर्षीय चालकाने कारवाईसाठी पुढे आलेल्या वाहतूक पोलिसाच्या अंगावरच कार घालून ती सुसाट पळवल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी पोलिस हवालदार कारच्या बोनेटवर घसरत गेल्याने काही काळ थरार निर्माण झाला. सुदैवाने हवालदाराने बोनेट घट्ट पकडून ठेवल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर वाहतूक शाखा युनिट क्रमांक 4 चे पोलिस हवालदार सुधीर राजाराम काकड (वय 47) सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास दत्तमंदिर सिग्नलवर वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत होते. त्याचवेळी संशयित चालक वैभव ज्ञानेश्वर दांडे (वय 22, मूळ रा. कावनई, ता. इगतपुरी; सध्या रा. ग्रॅज्युएट वडापाव दुकान, रविवार कारंजा) हा स्विफ्ट डिझायर (एमएच 15-जेएच 6577) कारमधून प्रवाशांना घेऊन भरधाव जात होता. दांडे याने सिग्नलचे उल्लंघन करून मोटवाणी रोडच्या दिशेने जाताना एका महिला दुचाकीस्वाराला धडक दिली. हा प्रकार निदर्शनास येताच हवालदार काकड यांनी कार थांबविण्याचा इशारा केला. कार थांबविण्यासाठी त्यांनी बोनेटवर हात ठेवून चालकाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हवालदार बोनेटसमोर असल्याचे लक्षात येऊनही चालकाने कार थांबविण्याऐवजी अचानक वेग वाढवून ती पुढे पळवली. त्यामुळे काकड हे कारच्या बोनेटवर घसरत गेले. त्यांनी प्रसंगावधान राखत बोनेट घट्ट पकडून ठेवल्याने त्यांचा जीव वाचला. या घटनेनंतर उपनगर पोलिस ठाण्यात चालक वैभव दांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Policeman dragged on car bonnet; case registered.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *