सुमित पगारे हत्याकांडाला दोन महिन्यांनी नवे वळण

कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

सिडको : प्रतिनिधी
सुमित पगारे हत्याकांडाला जवळपास दोन महिने उलटले असताना या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित सराईत गुन्हेगार राजू शेख याने पगारे कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी 26 सप्टेंबर रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पगारे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, राजू शेख, रईस उर्फ पापा शेख, जमीर रंगरेज यांच्यासह काही संशयित अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. दरम्यान, राजू शेख याने सुमित पगारे यांचे आत्येभाऊ सागर ऊर्फ बंटी मोरे तसेच पगारे कुटुंबीयांना दूरध्वनीवरून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित संभाषणाची ध्वनिफीत पगारे कुटुंबीयांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच नाशिकरोड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे सादर केल्याचे सांगितले. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, या संभाषणात राजू शेख याने बंटी मोरे याला, “माझ्या विरोधात मोर्चा काढलात तर सर्वांना जीवे ठार मारू. माझी माणसे सर्वीकडे आहेत. पंधरा मिनिटांत तुझा मर्डर करीन,” असा इशारा दिल्याचे सांगण्यात आले आहे.
या कथित फोन संभाषणात भूषण गोसावी प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. “या प्रकरणात पोलिसांना मॅनेज केले आहे, मला कोणी पकडू शकत नाही,” अशा आशयाचे कथित वक्तव्य राजू शेख याने केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
या संभाषणातील वक्तव्याची सत्यता अद्याप तपासातून निश्चित झालेली नाही. संबंधित ध्वनिफीत, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांची कायदेशीर आणि निष्पक्ष पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी पगारे कुटुंबीयांनी केली आहे.
“आमच्या आरोपांची निष्पक्षपणे चौकशी व्हावी. सुमितला न्याय मिळावा. तसेच आरोपींकडून आमच्या जीविताला धोका असल्याने कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे,” अशी मागणी काजल सुमित पगारे, रुचिका पगारे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
दरम्यान, या तक्रारीनंतर पोलीस कोणती कारवाई करतात, तसेच कथित धमकीच्या ध्वनिफितीची आणि अन्य तांत्रिक पुराव्यांची तपासणी कशी केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

New twist in Sumit Pagare murder case after two months

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *