गोंदे येथील कंपनीत गोळीबार करणारी टोळी जेरबंद; संशयित ताब्यात

गावठी कट्टा, दोन चॉपर जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

इगतपुरी /घोटी : प्रतिनिधी
गोंदे एमआयडीसी परिसरातील गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपासाची चक्रे फिरवत संशयितांची टोळी ताब्यात घेतली. पोलिसांच्या कारवाईत एक गावठी कट्टा, दोन चॉपर आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयितांच्या मागावर होते.तपासादरम्यान मारुती सुझुकी एर्टिगा वाहनातून संशयित मालेगावकडून नाशिकच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने सापळा रचला.
संशयित वाहन तेथे येताच पोलिसांनी कारवाई करत मयूर मोहन जाधव, करण सोपान आवारे, ओंकार शरद भोसले, रोशन धोंगडे आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन चॉपर आढळून आले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकलही पोलिसांनी जप्त केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण डी. एस. स्वामी यांच्या आदेशानुसार व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस हवालदार प्रविण काकड, संदीप नागपुरे, हेमंत गिलबिले, सचिन धारनकर, मयूर कांगणे, दीपक गुंजाळ, सतीश घुगे, संतोष गांगुर्डे, शिवाजी ठोंबरे, प्रवीण गांगुर्डे आणि माधव साळे यांनी सहभाग घेतला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात ताब्यात घेतलेल्या संशयितांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आले आहे. गोळीबारामागील नेमके कारण तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. गोळीबार प्रकरणातील संशयित ताब्यात आल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी, वापरलेली शस्त्रे आणि अन्य संभाव्य साथीदार याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Gang involved in shooting at a company in Gonde apprehended; suspects taken into custody.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *