रामवाडी ते घारपुरे घाट पुलाला अखेर ग्रीन सिग्नल

प्राधिकरणाची 41 कोटींच्या खर्चाला मंजुरी

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ प्राधिकरणाकडून रामवाडी ते घारपुरे घाट यादरम्यान नवीन पुलासाठी 41 कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. मात्र, कमी कालावधीत या पुलाचे काम कसे उभारणार, असा सवाल केला जात आहे. साधारणतः पंधरा महिने नवीन पूल उभारणीसाठी लागतात. दरम्यान, या पुलाची लांबी सुमारे दीडशे मीटर असून, बांधकामासाठी 25 कोटी व भूसंपादनासाठी 16 कोटींचा खर्च येणार आहे.
बांधकाम विभागाने शहरातील प्रस्तावित पुलांची यादी तयार केली असता, त्यात रामवाडी ते घारपुरे घाट पुलाचाही प्रस्ताव देण्यात आला होता. पण त्यावेळी प्राधिकरणाने सहा पुलांनाच मंजुरी दिल्याने या पुलाचे काम लटकले होते. सिंहस्थाच्या दृष्टीने या पुलाला मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचा दावा मनपाच्या बांधकाम विभागाकडून केला जात होता. भाविकांना पंचवटीत येण्या-जाण्यासाठी या पुलाची मोठी व्यवस्था होणार आहे. नाशिक महापालिकेच्या प्रस्तावानुसार प्राधिकरणानेही मान्यता दिली आहे. हा पूल उभारण्याची जबाबदारी नाशिक महापालिकेकडे आहे. नाशिक महापालिका हद्दीतील कामे गणेशोत्सवाच्या काळात थांबवण्याचे निर्देश महापौरांनी दिले होते. आता पाऊस उघडला असून, कामांना वेग येणार आहे. मात्र, ही कामे मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. यामुळे मोठ्या कामांचा महत्त्वाचा भाग सिंहस्थापर्यंत व उर्वरित कामे सिंहस्थानंतर पूर्ण करण्याचा व्यवहारी निर्णय घेण्याचेही प्रशासनाने मन बनवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून द्वारका चौकातील कामांपैकी केवळ नाशिक ते पुणे मार्गावरील भुयारी मार्ग व त्यालगतचे सर्व्हिस रोडची कामे सिंहस्थापूर्वी करण्याचा निर्णय कुंभमेळा प्राधिकरणने घेतला आहे. उर्वरित कामे सिंहस्थानंतर केली जाणार आहेत. यामुळे प्राधिकरणाकडून नवीन बांधकामांना मंजुरी दिली जाणार नसल्याचे मानले जात असताना प्राधिकरणाने महात्मानगर ते मोतीवाल कॉलेज या गंगापूररोडला समांतर रस्त्याच्या कामासाठी 65 कोटींंची प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानंतर आठवडाभरात प्राधिकरणाने रामवाडी ते घारपुरे घाट या पुलाच्या कामाला 41 कोटींंची प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत.

अशोक स्तंभावरील वाहतूक कोंडी फुटणार
अशोक स्तंभ ते रविवार कारंजा दरम्यान रस्ता अरुंद असल्याने सतत वाहतून कोंडी होते. यामुळे पंचवटीत जाण्यासाठी वाहनधारकांकडून रामवाडी पुलाचा वापर केला जातो. मात्र, त्यावरही प्रचंड वाहतूक कोंडी होतेे. यामुळे या पुलाला पर्यायी पुलाची मागणी होत होती. त्यातच आगामी सिंहस्थ पाहता रामवाडी पुलाला समांतर पूल असण्याची मागणी केली जात होती. महापालिकेच्या प्रस्तावानुसार प्राधिकरणाने आता रामवाडी ते घारपुरे घाट यांना जोडणारा नवीन पूल मंजूर केला आहे. या पुलामुळे अशोक स्तंभावरील वाहतूक कोंडी फुटण्याची शक्यता आहे.

Green signal finally for the Ramwadi to Gharpure Ghat bridge.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *