महापौर हिमगौरी आडके यांचा पत्रकार परिषदेत आरोप
नाशिक : प्रतिनिधी
विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेबाबत चुकीची माहिती आणि गैरसमज पसरवून नागरिकांमध्ये निवडणूक आयोगासह घटनात्मक संस्थांविषयी अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी केला.
लोकांना पटवून देता येत नसेल तर संभ्रमात टाका या भूमिकेतून विरोधकांकडून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत सोमवारी (दि. 28) त्या बोलत होत्या. यावेळी सरचिटणीस सुनील देसाई, भाजप प्रवक्ते व उत्तर महाराष्ट्र माध्यम विभागप्रमुख गोविंद बोरसे, नगरसेवक श्याम बडोदे आदी उपस्थित होते. एसआयआर प्रक्रियेबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी माहिती पसरवली जात असल्याचा दावा आडके यांनी केला. मतदानासाठी वापरल्या जाणार्या फॉर्म क्रमांक 6 च्या स्वरूपात कोणताही बदल झालेला नसतानाही त्याबाबत चुकीचा प्रचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
संविधानाचा आधार घेत घटनात्मक संस्थांविषयी चुकीची माहिती पसरवून लोकांचा त्यांच्यावरील विश्वास कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोणतीही माहिती सोशल मीडियावर किंवा माध्यमांतून समोर आल्यानंतर त्यावर तत्काळ विश्वास न ठेवता तिची सत्यता आणि पार्श्वभूमी तपासून पाहावी, असेही आडके यांनी सांगितले.
निवडणूक आयोग आणि ईव्हीएमबाबतही चुकीचे आरोप केले जात असून, ईव्हीएम 15 दिवसांत हॅक करून दाखवण्याचे आव्हान यापूर्वी देण्यात आले होते. मात्र, त्यावेळी कोणीही पुढे आले नाही. तिन्ही निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यात कोणताही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्य सचिवांकडे दिलेले पत्र हे एका बातमीच्या संदर्भातील होते, मतभेदाचे नव्हते, असे त्यांनी सांगितले.
एसआयआर प्रक्रियेची आवश्यकता स्पष्ट करताना आडके यांनी सांगितले की, गावांमधून शहरांकडे होणार्या स्थलांतरामुळे एकाच व्यक्तीचे दोन ठिकाणी मतदान राहू नये, यासाठी मतदार याद्या अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकारानुसार सर्व राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नियुक्त करण्यास सांगितले होते. मात्र, या प्रक्रियेत सहभागी होण्याऐवजी चुकीचे नॅरेटिव्ह तयार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
गणेशोत्सवासाठी नवीन एसओपीची गरज
गणेश विसर्जन मिरवणुकीतील वेळेचे नियोजन करण्यासाठी पुढील वर्षी नवीन मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्याची गरज असल्याचे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी सांगितले. रथ पुढे न सरकल्याने वेळेअभावी काही मंडळांना वाद्यवादन व सादरीकरणाची संधी मिळाली नाही. रात्री 12 वाजेपर्यंतची मुदत असतानाही काही मंडळांनी 15-20 मिनिटांऐवजी एक ते दीड तास वेळ घेतल्याचे त्यांनी सांगितले. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर पोलिसांनी पारदर्शकपणे कारवाई केली आहे. भाजपशी संबंधित मंडळांवरही कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी प्रत्येक मंडळाला चौकात 15 ते 30 मिनिटांचा निश्चित वेळ, पुणे-मुंबईच्या धर्तीवर विसर्जनाचा कालावधी वाढविणे आणि पारंपरिक वाद्यांना अधिक वेळ देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
Attempt by the opposition to spread a fake narrative.