कुत्र्यांच्या हल्ल्यात मरण्यापेक्षा इच्छामरणाची परवानगी द्या
निफाड : तालुका प्रतिनिधी
निफाड शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाकडे नगरपंचायतीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाने तीव्र आक्रमक पवित्रा घेतला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात बालके, महिला आणि ज्येष्ठ नागरिक जखमी होत असून, या त्रासाला कंटाळून चक्क “कुत्रे चावून तडफडून मरण्यापेक्षा आम्हाला ‘इच्छामरणाची’ परवानगी द्यावी,” अशा आशयाचे फलक शहरात झळकावण्यात आले आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. 30) सकाळी 11.30 वाजता नगरपंचायत कार्यालयासमोर टाळ-मृदंग आंदोलन करण्यात येत
आहे.
शहरातील शनि चौक, कापसे गल्लीसह नगरपंचायत कार्यालयासमोर प्रशासनाविरोधातील मजकुराचे बॅनर लावण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षांत मोकाट कुत्र्यांनी 8 ते 10 बालकांसह अनेक महिला व ज्येष्ठांचे लचके तोडले आहेत. मात्र, वारंवार निवेदने देऊनही नगरपंचायतीने यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. शहरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांपेक्षा येथील मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या निष्क्रियतेचाच अधिक धोका निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोप भाजपने
केला आहे.
भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी बुधवारी नगरपंचायतीसमोर जोरदार टाळ आंदोलन पुकारण्यात आले असून, शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या निवेदनावर भाजप नेते तथा निफाडचे माजी नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर, गणेश कापसे, संजय गाजरे, दीपक कुंदे, नगरसेवक जावेद शेख, संजय कुंदे, सचिन धारराव, समीर कुंदे, वैभव कापसे, गौरव व्यवहारे आदी पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
BJP’s unique ‘Taal Andolan’ in Niphad