शहरातील रस्ते पुन्हा खोदणार

प्रशासनाची ‘एमएनजीएल’ला शंभर किमीसाठी परवानगी

नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सव काळात महापालिकेने एमएनजीएल, फायबर ऑप्टिकल, बीएसएनएल, महावितरण आणि स्मार्ट सिटी कंपनीला शहरातील रस्ते खोदकामाला ब्रेक दिला होता. सिंहस्थ रस्तेकामे आणि खड्ड्यांमुळे नव्याने रस्ते खोदकामांना दिल्या जाणार्‍या परवानग्या मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी थांबवल्या होत्या. परंतु, गणेशोत्सव झाल्यानंतर प्रशासनाने संबंधित यंत्रणांना शिल्लक कामे करण्यासाठी पंधरा दिवसांसाठीची परवानगी दिली आहे. परंतु, दसर्‍यापूर्वी ही कामे मार्गी लावण्याची डेडलाइन संबंधित ठेकेदारांना प्रशासनाने दिली आहे. मात्र, यामुळे नाशिककरांची काही प्रमाणात पुन्हा वाट खडतर होणार आहे.
नवरात्री तसेच दसर्‍यापूर्वी ठेकेदार कंपन्यांना शहरातील शिल्लक खोदकामे पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले आहेत. नवरात्रोत्सव आणि दसर्‍यापूर्वी सुरक्षात्मक उपाययोजना राबवून कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश या कंपन्यांना दिले. परंतु, यामुळे शहरात पुन्हा खोदकामे सुरू होणार आहेत. गणेशोत्सवापूर्वी एमएनजीएल कंपनीने एक लाख गॅस कनेक्शनसाठी 100 किलोमीटर अंतर खोदकामाची परवानगी महापालिकेकडे मागितली होती. परंतु, पालिकेने गणेशोत्सवामुळे परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्टीकरण देत परवानगी नाकारली होती. दरम्यान, एमएनजीएलकडून शहरात आतापर्यंत 47 हजार घरांमध्ये गॅस कनेक्शन देण्यात आल्याचे समोर आले आहे. शहरातील रस्त्यांत घरोघरी गॅस कनेक्शन देण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अर्थात एमएनजीएलकडून सन 2018 पासून शहरात खोदकाम सुरू आहे. सध्या सिंहस्थाची कामे सुरू असतानाच, एमएनजीएलकडून सुरू असलेल्या बेफाम खोदकामामुळे पावसाळ्यात शहरातील नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात पाऊस सुरू असतानाच खड्ड्यांचे प्रमाण वाढल्यानंतर महापालिकेला नागरिकांचा रोष सहन करावा लागला होता. त्यामुळे महासभेत खड्ड्यांचे खापर एमएनजीएल कंपनीवर फोडण्यात आले होते. परंतु, कंपनीने आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर सर्व आरोप फेटाळून लावले होते. नाशिक महापालिका हद्दीत भूमिगत गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी सुमारे 740 किलोमीटरची अधिकृत मंजुरी आहे. त्यापैकी तब्बल 640 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, सद्यस्थितीत 100 किमी रस्ते खोदकाम बाकी आहे, असे स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान, आता शिल्लक कामे करण्याकरिता पुन्हा रस्ते खोदकाम केले जाणार असून, नवरात्रीपूर्वी ही कामे करण्याचे सक्त निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

City roads to be dug up again.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *