अमेरिका आणि चीनमधील दीर्घकाळ सुरू असलेले व्यापारयुद्ध सौम्य झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी सुमारे 60 अब्ज डॉलरच्या व्यापारावर लागू असलेल्या आयात शुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या करारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी भारतासाठी त्याचे काही परिणाम होऊ शकतात. दोन परस्परविरोधी शक्तिशाली देशांचे नेते जेव्हा एकमेकांना भेटतात, तेव्हा ते आपापल्या देशांचे हित पाहतात. ताणून धरले, तर फारसा उपयोग होत नाही, हे त्या नेत्यांच्या लक्षात येते. गेल्या वर्षभरात अमेरिका व चीन या देशांची जवळीक वाढली आहे. दोन्ही देशांनी उभयपक्षी संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन शिखर परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट 30 ऑक्टोबर 2025 रोजी दक्षिण कोरियातील बुसान येथील हवाई विमानतळावर झाली होती. दोन्ही देशांत तीव्र व्यापारयुद्ध सुरू असताना ही भेट झाली होती. ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर जबर आयातशुल्क लादले, त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकन वस्तूंवर तितकेच जबर शुल्क लादले होते. बुसान येथील भेटीत दोन्ही देशांनी आपापले हित साधले. चीनवर लादलेल्या आयातशुल्कात दहा टक्के कपात करण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. या बदल्यात चीनने अमेरिकेचे सोयाबीन खरेदी केले. चीन हा सोयाबीन उत्पादक देश असूनही त्याने अमेरिकेचे सोयाबीन घेण्याच्या बदल्यात 10 टक्के आयातशुल्क कमी करून घेतले. अमेरिकेने आपल्या देशातील सोयाबीन उत्पादकांना चीनची बाजारपेठ उपलब्ध करून दिली. दोन्ही देशांनी आपले हित साधले होते. ‘आमची भेट भविष्यात खूप यशस्वी होणार आहे,’ असे ट्रम्प म्हणाले होते. ‘आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो, आमचे नेहमीच खूप चांगले संबंध राहिले आहेत,’ असे विधान ट्रम्प यांनी केले होते. ‘खूप दिवसांनी एका मित्राला भेटणे माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. चीनच्या अत्यंत आदरणीय आणि सन्माननीय राष्ट्रपतींशी आम्ही आधीच अनेक गोष्टींवर सहमती दर्शवली आहे आणि आम्ही आणखी काही गोष्टींवर सहमत होऊ; परंतु अध्यक्ष जिनपिंग हे एका महान देशाचे महान नेते आहेत आणि मला विश्वास आहे की, आमचे संबंध दीर्घकाळासाठी अद्भुत राहतील. तुम्ही आमच्यासोबत असणे ही सन्मानाची गोष्ट आहे,’ असेही ट्रम्प म्हणाले. ‘अध्यक्ष ट्रम्प यांना पुन्हा भेटून खूप आनंद झाला आहे. कारण अगोदरच्या भेटीला अनेक वर्षे उलटून गेली आहेत,’ असे विधान जिनपिंग यांनी केले होते. याच बैठकीत एक वर्षासाठी व्यापारयुद्धविराम करण्यात आला होता. याच बैठकीत ट्रम्प यांनी मे 2026 मध्ये चीनला भेट देण्याचे आणि जिनपिंग यांनी सप्टेंबर 2026 मध्ये अमेरिकेला भेट देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार ट्रम्प यांनी मे 2026 मध्ये चीनला भेट दिली. बीजिंग विमानतळावर 13 मे रोजी चीनचे उपाध्यक्ष हान झेंग यांनी त्यांचे स्वागत केले. दुसर्या दिवशी ग्रेट हॉल ऑफ द पीपलच्या बाहेर भव्य लष्करी मानवंदना (मिलिटरी ऑनर गार्ड), रेड कार्पेट आणि मिलिटरी बँडसह राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांचे स्वागत केले. शी जिनपिंग यांनी ग्रेट हॉल ऑफ द पीपलच्या गोल्डन रूममध्ये ट्रम्प यांच्यासाठी शाही भोजन आयोजित केले होते. गैरसंवेदनशील वस्तूंच्या व्यापारावर देखरेख ठेवण्यासाठी अमेरिका-चीन व्यापार मंडळ आणि गुंतवणुकीसाठी अमेरिका-चीन गुंतवणूक मंडळ स्थापन करण्याचे दोन्ही देशांनी ठरवले. व्यापार तूट कमी करण्यासाठी चीनने अमेरिकेकडून 200 बोईंग विमाने खरेदी करण्याचे मान्य केले. तसेच होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यावर आणि ऊर्जा सुरक्षेवर दोन्ही देशांचे एकमत झाले. चीनने 2026 ते 2028 या काळात दरवर्षी किमान 17 अब्ज डॉलर्सची अमेरिकन कृषी उत्पादने खरेदी करण्याचे मान्य केले. तसेच चारशेहून अधिक अमेरिकन बीफ कंपन्यांना चीनची बाजारपेठ पुन्हा खुली करण्यात आली. रचनात्मक, धोरणात्मक आणि स्थिर संबंध प्रस्थापित करण्यावर एकमत झाले. उत्तर कोरियाचे अण्वस्त्रीकरण रोखणे आणि इराणला अण्वस्त्रेे मिळवण्यापासून रोखण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अमेरिकेच्या एनव्हिडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग हे ट्रम्प यांच्यासोबत या दौर्यावर होते. यावेळी अमेरिकेने एनव्हिडिया एच-200 या अत्यंत प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चिप्स चीनमधील दहा मोठ्या कंपन्यांना विकण्यासाठी मंजुरी दिली. एनव्हिडियासाठी चीनची अवाढव्य बाजारपेठ पुन्हा खुली झाली. बुसानमध्ये ठरल्यानुसार, जिनपिंग यांनी 23 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत अमेरिकेला भेट दिली. प्रथेचे उल्लंघन करून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉइंट बेस अँड्र्यूज विमानतळावर त्यांचे वैयक्तिकरीत्या स्वागत केले आणि रेड कार्पेट अंथरून त्यांना औपचारिक सन्मान दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सहसा व्हाइट हाउसमध्ये परदेशी नेत्याचे स्वागत करत असल्यामुळे परदेशी नेत्याच्या स्वागतासाठी विमानतळावर येणे ही असामान्य बाब ठरली. जिनपिंग यांचे विमान उतरताच त्यांचे रेड कार्पेट अंथरून जंगी स्वागत करण्यात आले. त्यांना लष्कराकडून सन्मानपूर्वक 21 तोफांची सलामी देण्यात आली. स्वागत सोहळ्यादरम्यान अमेरिकन हवाई दलाच्या दोन बी-1 लॅन्सर सुपरसॉनिक बॉम्बर आणि इतर लढाऊ विमानांनी आकाशातून झेप घेत शानदार हवाई सलामी दिली. व्हाइट हाउसच्या साउथ लॉन्सवर शेकडो अमेरिकन लष्करी जवानांच्या उपस्थितीत त्यांचा औपचारिक स्वागत सोहळा पार पडला. यानंतर ट्रम्प यांनी शी जिनपिंग आणि त्यांच्या पत्नी पेंग लियुआन यांच्या सन्मानार्थ व्हाइट हाउसमध्ये शाही भोजन आयोजित केले होते. चीनमध्ये ट्रम्प यांचे मे महिन्यात जसे स्वागत करण्यात आले, त्याच पद्धतीने जिनपिंग यांचे अमेरिकेत स्वागत करण्यात आले. बुसान बैठकीपासून दोन देशांची व जागतिक नेत्यांची जवळीक वाढल्याचे या भेटीतून दिसले. अमेरिका आणि चीन या दोन्ही सरकारांनी उच्चस्तरीय संवाद सुरू ठेवण्याची आणि परस्परसंपर्क कायम ठेवण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे. दोन नेत्यांच्या भेटींमुळे दोन्ही देशांतील व्यापारयुद्धाला आता ब्रेक लागला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी सुमारे 60 अब्ज डॉलरच्या व्यापारावर लागू असलेल्या आयातशुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. करारानुसार अमेरिका आणि चीन एकमेकांकडून आयात होणार्या सुमारे 30-30 अब्ज डॉलरच्या बिगर-संवेदनशील वस्तूंवरील टॅरिफमध्ये सवलत देणार आहेत. दोन्ही देशांमधील या व्यापारयुद्ध विरामाची मुदत 10 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. अमेरिकन बाजारात या चिनी वस्तू तुलनेने स्वस्त होऊ शकतात. या निर्णयामागे अमेरिकेची आर्थिक आणि धोरणात्मक दोन्ही कारणे असल्याचे दिसते. चिनी वस्तूंवरील शुल्क कमी झाल्यास अमेरिकन बाजारातील काही वस्तूंच्या किमती कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे महागाईवरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न म्हणूनही या निर्णयाकडे पाहिले जात आहे. याशिवाय दुर्मिळ खनिजे हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. संरक्षण उपकरणे, स्मार्टफोन, इलेक्ट्रिक वाहने आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रासाठी ही खनिजे अत्यंत महत्त्वाची आहेत. या क्षेत्रातील चीनचे वर्चस्व असल्याने अमेरिकेला चीनसोबतचे आर्थिक संबंध पूर्णपणे तोडणे कठीण आहे. अमेरिका-चीन व्यापार संबंध सुधारल्यास काही कंपन्या पुन्हा चीनमधून खरेदी करण्याकडे वळू शकतात. त्याचा परिणाम भारताच्या उत्पादन क्षेत्रावर आणि निर्यातीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीत भारतासाठी काही संधीही कायम आहेत. चीनने अमेरिकन सोयाबीन आणि काही कृषी उत्पादनांवरील शुल्क पूर्णपणे कमी केलेले नसल्याने भारतीय कृषी निर्यातदारांसाठी चीनच्या बाजारपेठेत संधी निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हाय-टेक मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि पुरवठा साखळीतील विविधता यासाठी भारताचे महत्त्व कायम राहू शकते. त्यामुळे अमेरिका-चीनमधील करार भारतासाठी एकाच वेळी आव्हान आहे आणि संधीही आहे.
Trade war mild