अंबड औद्योगिक वसाहतीतील रासायनिक पाण्याचा धोका

हातपंप, विहिरी, नाले प्रदूषित झाल्याचा आरोप

सिडको : प्रतिनिधी

अंबड औद्योगिक वसाहतीतील काही कोटिंग उद्योगांतून सोडण्यात येणारे पिवळसर रंगाचे रासायनिक दूषित पाणी प्रभाग क्रमांक 27 मधील मारुती संकुल, दत्तनगर, तुळजाभवानी परिसर तसेच नवनाथ महाराज मंदिर परिसरात पोहोचत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील नाले, हातपंप आणि विहिरींचे पाणी प्रदूषित होत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, पाण्याचा रंगही बदलत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. रासायनिक पाणी जमिनीत झिरपल्यामुळे हातपंप आणि विहिरींचे पाणी वापरणे धोकादायक ठरत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दूषित पाणी सोडणार्‍या कारखान्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिकेने परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आगामी महासभेत हा प्रश्न ठामपणे मांडण्यात येईल, असे प्रभागाचे नगरसेवक नितीन दातीर यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. दूषित रासायनिक पाणी नाल्यात सोडणार्‍या कारखान्यांविरोधात प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर संबंधित कारखान्यांसमोर जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नितीन दातीर यांच्यासह शंकर घायाळ, ज्ञानेश्वर आडके, विजू आहेरे, संतोष उगले, रंगनाथ घायाळ आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात आणि रासायनिक प्रदूषणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली
आहे.

The threat posed by chemical wastewater in the Ambad Industrial Estate.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *