पितृपंधरवड्यात कुशावर्त घाट बंद

भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचल्याची भावना
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील ऐतिहासिक कुशावर्त घाट पुढील एक महिना बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. पितृपंधरवड्यातच घाट बंद ठेवल्याने देश-विदेशातून श्राद्धविधीसाठी आलेल्या भाविकांच्या श्रद्धेला मोठा धक्का बसला आहे. राज्य पुरातत्त्व विभागामार्फत कुशावर्त घाट आणि परिसर संवर्धनाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू असतानाच अचानक ध्वजारोहणाचे कारण पुढे करत प्रशासनाने कुशावर्त घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. घाट कोरडाठाक करून भाविकांना स्नानापासून वंचित ठेवल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कुशावर्त घाटावर स्नान केल्याने पापक्षालन होते आणि पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रभू श्रीरामाने येथे पिता दशरथ यांचे पिंडदान केले होते, अशी पौराणिक मान्यता आहे. यामुळेच पितृपक्षात नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी देश-विदेशातून हजारो भाविक त्र्यंबकेश्वरला येतात. मात्र, ऐन पितृपक्षात घाट बंद ठेवल्याने आधीच नियोजन व बुकिंग करून आलेल्या भाविकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न केवळ आर्थिक उलाढालीचा नसून भाविकांच्या श्रद्धेचा आहे.

Kushavarta Ghat closed during Pitru Paksha.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *