सलग सुट्यांमुळे गर्दीवर नियंत्रणात अपयश
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
शासनाने दुष्काळातून वगळले असले, तरी प्रशासकीय नियोजनाअभावी त्र्यंबकनगरीला सध्या भीषण नियोजनाच्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पितृपक्ष आणि सलग शासकीय सुट्यांमुळे शहरात भाविकांचा महापूर लोटला आहे. परंतु, या गर्दीच्या व्यवस्थापनात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
कुंभमेळ्याच्या तयारीचे कारण पुढे करत कुशावर्त तीर्थ घाट बंद केला असून, कुंड कोरडाठाक केला आहे. परिणामी, धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच दिवसभर होणारा विजेचा लपंडाव आणि नगरपरिषदेचा विस्कळीत पाणीपुरवठा यामुळे नागरिकांना आणि भाविकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. नळाला पाणी नाही, तर दुसरीकडे खोदलेल्या रस्त्यांमुळे शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी खोदलेले रस्ते अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत. या खड्ड्यांमध्ये आणि अंधारात धडपडून भाविक जखमी होत आहेत. शहरात ठिकठिकाणी साचलेली अस्वच्छता, भटक्या श्वानांचा वाढलेला वावर आणि डासांचा सुळसुळाट यामुळे येथे नगरपरिषद अस्तित्वात आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
त्र्यंबकवासीयांमध्ये नाराजी
कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार्या पितृपंधरवड्यात प्रशासनाच्या धरसोडीच्या कारभाराने त्र्यंबकवासीयांवर आणि भाविकांवर यमयातना भोगण्याची वेळ आणली आहे. लक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या या पवित्र नगरीला सध्या प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अवदसेचा सामना करावा लागत असून, त्र्यंबकवासीयांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे
A tidal wave of crowds and a drought of planning in the holy city of Trimbak.