धर्मांतराचाही प्रयत्न झाल्याची चर्चा
सिडको : प्रतिनिधी
जुने नाशिक परिसरातील अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून भद्रकाली पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून, आरोपीचे नाव अमन असल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा त्याअनुषंगाने तपास सुरू आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मुलीवर ती अल्पवयीन असल्यापासून मागील पाच वर्षांच्या कालावधीत लैंगिक अत्याचार केला जात होता.
दरम्यान, या प्रकरणात धर्मांतराचाही प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत असली तरी त्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. शुक्रवारी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासल्यानंतरच पुढील कारवाईचे स्वरूप स्पष्ट
होणार आहे.
तपासाबाबत संशयाचे धुके
प्रकरणाची माहिती सुरुवातीला समोर न आल्याने भद्रकाली पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, पोलिसांनी जाणीवपूर्वक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, अथवा आरोपीला कोणाचा पाठिंबा आहे, याबाबत सध्या कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे या आरोपांचीही पोलिसांच्या तपासातूनच पडताळणी होणे अपेक्षित आहे.
Minor girl sexually abused for five years