गंगापूर ते बारदान फाट्यापर्यंतचा प्रवास त्रासदायक
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या रुंदीकरण कामाला सुरुवात झाली असताना, सध्याच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि क्रॉसिंगकडे झालेले दुर्लक्ष यामुळे गंगापूररोडवरील प्रवास वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
स्मार्ट सिटीबरोबरच गॅस पाइपलाइन व मनपाच्या जलवाहिनीसाठी खोदलेल्या रस्त्याची डागडुजी व्यवस्थित न केल्यामुळे सध्या या रस्त्यावरून वाहने चालविताना वाहनधारकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच सध्या या रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. मात्र, हे करताना रस्त्याची पुरती वाट लागली आहे.
ठिकठिकाणी खड्डे पडले असून, गॅस पाइपलाइनसाठी रस्ता खोदल्यानंतर क्रॉसिंग बुजविलेले नाही. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आठ दिवसांत खड्डे बुजविण्याचे दिलेले आश्वासन हवेत विरून गेले आहेत. आता पाऊस नसल्याने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. सोमेश्वर येथील मंदिरासमोर तसेच सोमेश्वरजवळील बालाजी लॉन्स, बेंडकुळेनगरच्या कॉर्नरवर मोठे खड्डे पडले आहेत. अशोक स्तंभापासून ते बारदान फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर वाहने चालविताना मोठी कसरत वाहनधारकांना करावी
लागत आहे.
बारदान फाटा ते त्र्यंबकरोड या लिंकरोडलाही मोतीवाला कॉलेजजवळ आणि भवर टॉवरजवळ रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडून खडी उघडी पडली आहे. त्यामुळे वाहने जा-ये करून धूळ उडते. त्याचा त्रास दुकानदारांबरोबरच वाहनधारकांनाही सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या साइडपट्ट्या तर कधीच गायब झाल्या आहेत. या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याने आगामी काळात सहा महिने एकेरी वाहतूक या मार्गावर होणार आहे. मात्र, हा एकेरी मार्गही अतिशय खराब असल्याने तात्पुरती मलमपट्टी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
On one hand, road widening; on the other, a reign of dust and potholes.