नांदूरमध्यमेश्वरमधून 3,155 क्यूसेक पाणी सोडल्याने संताप
निफाड : तालुका प्रतिनिधी
पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होत असतानाच, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव व राहाता तालुक्यासाठी पाटबंधारेमंत्र्यांच्या आदेशानुसार नाशिकचे पाणी पळविण्यात येत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात 3,155 क्यूसेक वेगाने सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धरणाची पातळी तब्बल चार ते सात
फुटांनी खाली गेली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या एका गेटमधून सोमवारी (दि. 5) दुपारी तीनला 3,155 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले, जे तब्बल 22 तासांनंतर मंगळवारी (दि. 6) दुपारी 1 वाजता बंद करण्यात आले. कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवरील बंधारे भरून घेण्यासाठी कुठलीही पूर्वकल्पना न देता हे पाणी सोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या विसर्गामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणापासून वरील गोदावरी नदीपात्राची पाणीपातळी सात
फुटांनी, तर धरणाच्या भिंतीकडील पाणीपातळी चार फुटांनी खाली गेली आहे. विशेष म्हणजे, पाणी जलद गतीने पुढे जावे, यासाठी निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवरील काही बंधार्यांचे गेट काढून टाकण्यात आल्याचेही समोर आले आहे.
नाशिकच्या शेतकर्यांवर अन्याय
सध्या नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. त्यातच महावितरणच्या लपंडावामुळे शेतकर्यांना रात्री-बेरात्री मिळणारे पाणी देणेही मुश्कील झाले आहे. “पाण्याचा काटकसरीने वापर करा,“ असा सल्ला सरकार देत असले तरी हा नियम फक्त नाशिकच्याच शेतकर्यांसाठी आहे का? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. नदीपात्रातील पाणी अचानक खाली गेल्यामुळे चापडगाव परिसरातील शेतकर्यांचे विद्युत पंप उघडे पडून बंद पडले आहेत, तर गोदावरी नदीकाठचे पक्षी अभयारण्यातील पक्षांचा अधिवासही धोक्यात आला आहे.
सोमवार सायंकाळपर्यंत आमचे विद्युत पंप चालू होते; परंतु अचानक नदीचे पाणी खाली गेल्यामुळे पंप उघडे पडून बंद झाले आहेत. पाणीपातळी अशीच खोल गेल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर होईल.
– सोमनाथ अशोक गीते, शेतकरी (चापडगाव)
नांदूरमध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडले ही बाब खरी आहे. मात्र, सुरुवातीला 500, नंतर 1500 आणि त्यानंतर 3 हजार क्यूसेक असे टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात आले. नेमकी क्यूसेकची आकडेवारी सध्या माझ्याकडे आलेली नाही. माहिती मिळाल्यावर ती सामायिक केली जाईल.
– सोनल सहाणे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, नाशिक