भोळी बाभळी

– प्रणाली देशमुख
तू सुंदर आहेस पण ग्लॅमरस नाही, कदाचित म्हणूनच तू गुणाची खाण जरी असलीस तरी तुझं दिसणं तुझ्या असण्याला कुठे तरी कमी करतं. उष्णकटिबंधात निभावून घेणारी, गुणकारी, असणारी तू जाणून आहे सगळे तुला, परंतु तुझी जागा बांधावर, एकाकी, शेताच्या धुर्‍यावर कुणी अंगणात नाही देत जागा. का तर तू काटेरी आहेस. मग कॅक्टस पण काटेरीच असतो ना? तो चालून जातो अंगण आणि घरातही.
ओसाड, निर्जन, काठावर, गावाबाहेर ऐटीत राहतेस. दिमाखात मिरवते तुझा थाट, पिवळी गोबरी गोल फुलं, बारीक नाजूक पानं, काटेरी फांद्या, लटपट शेंगा. सगळा डोलारा घेऊन मजेत राहतेस. हे आनंदी जगणं शिकावं तुझ्याकडून आणि राहावं असंच कुठलीच तक्रार न करता स्वतःच्या हिमतीवर.
सागवानाला नसेल लागत वाळवी परंतु अवजाराच्या मुठा, वल्हे, खास तुझ्याच लाकडापासून बनतात. तुझंही लाकूड टणक टिकावू, मजबूत आणि वाजवी आहे. तुझ्या फांद्यांचा आधार घेऊन विणतात सुगरणी घरटी. थाटतात इवला संसार, शेळ्या मेंढ्यांच्या पोटापाण्याचा सुटतो प्रश्न. माकड, हत्ती, चवीचवीनं खातात शेंगा आणि खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे ही म्हण प्रत्यक्षात उतरवतात. दूरपर्यंत जातात तुझ्या बिया. पाऊस आला की कितीतरी नवीन रोपं दिसतात. तू कधी उगवते कधी मोठी होतेस कधी वयात येतेस पत्ताच लागत नाही . काय काय अन् किती किती लपलंय तुझ्यात, खोडातून झिरपणारा पौष्टिक डिंक, दातांना निरोगी ठेवण्याच्या युक्त्या, अनेक आजारावर सटीक उपाय, तुझं आयुर्वेदात खूप महत्व आहे. याचा तुला तिळभरही अभिमान नाही. शेताच्या सीमा ठरवायला काटेरी फांद्याच लागतात. तीक्ष्ण टोकदार काटे बघून हद्द ओलांडायची कुणाची हिंमत होत नाही. जर काटा पायात रुतला तर तो तुझ्याच काट्याने काढावा लागतो इतका टणकपणा कुठून आणतेस. तुझ्या तर काट्यालाही ओळख आहे वेगळी.
गोल गोबरी फुलं अशी नाजूक साजूक नसतात, कडक उन्हातला टवटवीत बहर मन मोहून टाकतो. पिवळं धम्म झालेलं झाड बघतांना. हे पिवळसर रूप हळद लागलेल्या नववधूसारखं दिसतं. तुझं नवखेपण जरी सरलं पानं गळाली, शेंगा वाळल्या फक्त फांद्या आणि काटे तितके दिसतात. तरिही तू सुंदरच दिसतेस. आता काटेरी काया जास्तच डोळ्यात भरते.
ओबडधोबत भेगाळलेलं खोड, काळसर साल जणू वाळलेली त्वचाच दिसत असली तरी इथे कीटकांना आश्रय मिळतो. तुझं लाकूड जितकं ज्वलनशील तितकंच दीर्घ काळ जळत राहतं. कितीतरी चुली तुझ्यामुळे पेटतात. मला आठवतं अंगणात आई जेव्हा शेणाचा सडा टाकायची थोडा वाळल्यावर झाडताना कचर्‍यात सापडणारे दामोटे म्हणजेच बिया जमवून ठेवायला फार आवडायचं, गुळगुळीत वाळलेले दामोटे खेळायला आम्ही घ्यायचो.
अलीकडे अन् पलीकडे तू आणि मधे दूर जाणारा रस्ता जसा चालतो तशी तुही चालतेस की काय असंच वाटतं. कुठेही आनंदानी जगणं आणि जागवण तुझ्याकडून शिकावं बाभळी.
शेवटी बाभूळ केवळ शेताच्या बांधावर उभं असलेलं एक काटेरी झाड राहत नाही, तर ते स्वाभिमान, सोशिकता आणि निरपेक्ष दातृत्वाचं एक जिवंत प्रतीक बनून समोर येतं. ऋतू बदलतील, ऊन-पावसाचे खेळ चालत राहतील, जग दिसण्यामागच्या देखणेपणाला भुलत राहील; पण तू मात्र तुझं अस्तित्व, तुझे काटे आणि तुझा पिवळा बहर घेऊन तशीच कणखर उभी राहशील-एकटी, अनिकेत, तरीही परिपूर्ण! तुझ्या या काटेरी कायेतून आणि ओबडधोबड खोडातून वाहणारा रस हाच शिकवतो की, आयुष्यात प्रसंगी काटे सहन करावे लागले, तरीही दुसर्‍यांच्या आयुष्यात सुगंध आणि आसरा कसा निर्माण करावा. म्हणूनच बाभळी, तू अंगणात नसलीस तरी या मातीतल्या, या निसर्गातल्या आणि माणसाच्या जगण्यातल्या खर्‍या ‘गुणाची खाण’ म्हणून कायम प्रत्येकाच्या मनात मानाचं स्थान पटकावून राहशील.

Innocent Babhul

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *