पळाशी : वार्ताहर
नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे गावात पुन्हा घरफोडी झाली. त्यात बंद असलेल्या घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी सुमारे 20 तोळे सोन्याचे व 72 भार चांदीचे दागिने आणि पाच हजार रुपये रोकड लंपास केली. याविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
साकोरा येथील निवृत्त रेल्वे कर्मचारी सुरेश नंदा बोरसे यांच्या बंद घरात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी घराचे कुलूप उघडून कपाटाचे लॉक तोडले. त्यातील पट्टीपोत, शॉर्टपोत, चेन, अंगठ्या, नेकलेस, ओमपान, काळी पोत, पांचाळी, तोंगल, साधी पोत, डोरलं, पुतळ्या आदी सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच दनकडे, तोडल्या, जोडवे, अंगठ्या आदी चांदीचे दागिने आणि पाच हजार रुपये रोकडही लंपास केली. सकाळी मंगल बोरसे यांनी घरात प्रवेश केल्यानंतर चोरी झाल्याचे समोर आले.
दरम्यान, काही अंतरावर कुसुम अनंत चव्हाण यांच्या घराचे कुलूप व कोयंडाही कापल्याचे आढळून आले. त्यामुळे चोरट्यांनी आणखी घरांना लक्ष्य केले असण्याची शक्यता आहे. साकोरा परिसरात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोर्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी. चोरीचा तपास करावा, अशी मागणी होत आहे.
Burglary at Sakora; 20 tolas of gold stolen.