मतचोरी विरोधात दिल्लीत काँग्रेस आघाडीचा महामोर्चा

मोदींचे अधिकारी संपर्कात : राहुल गांधी; सरन्यायाधीशांनी नाकारली भेट

नवी दिल्ली : प्रतिनिधी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून तापली आहे. एकीकडे सीजेपीचा जंतर-मंतरवरील आंदोलन, तर दुसरीकडे सोमवारी (दि. 12) इंडिया आघाडीचा सुप्रीम कोर्टापर्यंतचा महामोर्चा, अशा दुहेरी घेरावाने राजधानीत 30 हजार पोलिसांचा बंदोबस्त आणि अभूतपूर्व तणाव आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी मोर्चाला सामोरे जाऊन भेट नाकारली. सर्वोच्च न्यायालय सर्वांसाठी खुले आहे. याचिकेद्वारे म्हणणे मांडा, असे ते म्हणाले. त्यानंतरही काँग्रेस मोर्चावर ठाम राहिली.
निवडणूक आयोगाविरोधात 124 पानांची याचिका काँग्रेसने दुपारी दाखल केली. मोर्चापूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींचे अधिकारी संपर्कात असल्याचे आणि पोलिसही आंदोलनाच्या बाजूने असल्याचा दावा केला.
इंदिरा भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी मोदी सरकारला हादरवणारे दोन मोठे दावे केले. मोदी सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले. मोदीजी, तुम्हाला धक्का बसेल. तुमच्या सरकारमधले 200 अधिकारी आमच्या संपर्कात आहेत आणि आम्हाला माहिती पुरवत आहेत. ईडी, सीबीआय, परराष्ट्र मंत्रालयातले अधिकारी आम्हाला आतली माहिती देत आहेत. तुम्हाला जे करायचे ते करा, सत्य आमच्या बाजूने आहे, असा इशारा राहुल यांनी दिला.
50 टक्के पोलीस आम्हालाच सांगताहेत, तुम्ही जे करताय ते योग्य आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले, दिल्ली पोलीस, आयटीबीपी, सीआरपीएफ मधले तब्बल 50 टक्के जवान आम्हाला सांगत आहेत की, तुम्ही जे करताय ते योग्य आहे, लढा सुरू ठेवा. जनता, पोलीस एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला नरेंद्र मोदी, अमित शाह, अजित डोभाल, ज्ञानेश कुमार आणि मत चोरी करणारे निवडणूक आयोगाचे 4 ते 5 अधिकारी, असे राहुल म्हणाले. ते पुढे म्हणाले, ज्ञानेश कुमारला रात्री झोप लागत नाही. मी त्यांना थेट सांगतो, तुम्ही मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिकणार नाही. चूक झाली आहे, तुम्ही मास्टरमाइंड नाही, हे आम्हाला माहिती आहे, दबावात आहात. राजीनामा देऊन सरकारी साक्षीदार व्हा, आम्ही माफ करण्याचा विचार करू.
इंडिया आघाडीचा मोर्चा
सोमवारी दुपारी 1:30 वाजता कॅनॉट प्लेस – बाराखंबा जंक्शनपासून सर्व इंडिया आघाडीचे खासदार, कार्यकर्ते आणि नागरिक सुप्रीम कोर्टाकडे कूच केली. दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. दिल्लीत अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी मोर्चा सुप्रीम कोर्टाच्या आधी, भगवान दास रोडजवळ अडवला, त्यानंतर काँग्रेसच्या विधी पथकाने दुपारी कोर्टात याचिका जाऊन ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 124 पानी याचिका दाखल केली. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासह ’इंडिया’ आघाडीच्या 11 नेत्यांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ही याचिका संयुक्तपणे दाखल केली आहे. दरम्यान, या मोर्चात राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सुप्रिया सुळे, संजय राऊत, योगेंद्र यादव आणि नेहा बोरा यांच्यासह अनेक विरोधी खासदार आणि नेते सहभागी झाले होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, आजवर इतिहासात कधीही एवढ्या मोठ्या राजकीय शिष्टमंडळाने सुप्रीम कोर्टाकडे मोर्चा काढला नाही, हे अभूतपूर्व आहे. भाजपचा कुणी समर्थक असला, तरी त्यालाही आता वाटतेय की, संविधानावर हल्ला होतोय. ही लढाई राहुल विरुद्ध मोदी नाही, तर संविधान वाचवण्याची आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली होती, पण सरन्यायाधीश कार्यालयाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने भेट नाकारली आणि याचिका दाखल करण्यास सांगितले.

जंतर-मंतरवर आंदोलनांसाठी बंदी, तीन नवी ठिकाणे जाहीर
राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध आंदोलनस्थळ असलेल्या जंतर-मंतरला आता अधिकृत आंदोलनस्थळ म्हणून रद्द (डी-नोटिफाइड) करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे. आता आंदोलनासाठी तीन नवीन ठिकाणे जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरिकांच्या आंदोलनाच्या अधिकारासाठी पर्यायी योग्य ठिकाणे शोधण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. त्या समितीच्या शिफारशींच्या आधारे दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. आदेशानुसार, जंतर-मंतरच्या जागी आता दिल्लीत तीन नवीन ठिकाणे आंदोलनासाठी निश्चित करण्यात आली आहेत. रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी ग्राउंड, पूर्व दिल्ली ही तीन नवी ठिकाणे आंदोलनांसाठी जाहीर करण्यात आली आहेत.

पंतप्रधान मोदी जाणार, सरकार पडणार : खा. राऊत
पुढील पाच ते सहा महिन्यांत केंद्रातील भाजप सरकार सत्तेत दिसणार नाही आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असा दावा शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देशातील
सद्यःस्थितीमुळे केवळ विरोधकांमध्येच नव्हे, तर खुद्द भाजपमध्येही मोठी खदखद आहे. पक्षातील चार प्रमुख नेते लवकरच वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

आंदोलनावरून कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले
सीजेपीच्या आंदोलनादरम्यान झालेल्या बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याच्या आणि पोलीस दडपशाहीच्या आरोपांवर सुप्रीम कोर्टाने विशेष सुनावणी घेत केंद्र सरकारला चांगलेच फटकारले आहे. शांततेने जमणार्‍यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊ नका, असे निर्देश न्यायालयाने दिले. याशिवाय, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दिल्ली शहराला वेठीस धरण्याचा प्रकारावरही न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली. मेट्रो, रेल्वे, इंटरनेट सुरू ठेवा, बॅरिकेड्स तत्काळ हटवा, दिल्लीतील सर्वसामान्य जनतेची गैरसोय करू नका, असे न्यायालयाने सुनावले.

 

Congress alliance’s massive rally in Delhi against vote theft.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *