फोरम ऑफ मेयर्समध्ये भारताचे नेतृत्व, विदेशी पाहुण्यांना सिंहस्थ कुंभमेळ्याचे आमंत्रण
नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकला जागतिक ओळख मिळणार आहे. तसेच सिंहस्थ हा केवळ धार्मिक सोहळा नसून, नाशिकच्या पायाभूत सुविधा, पर्यटन, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि जागतिक प्रतिमा उंचावण्याची मोठी संधी आहे, असे प्रतिपादन नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी जीनिव्हामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेत केले. यावेळी त्यांनी भारताचे नेतृत्व करताना विविध विषयावर मत मांडले.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पुढाकाराने जीनिव्हा येथे 11 ते 14 ऑक्टोबरदरम्यान जागतिक महापौर परिषदचे (फोरम ऑफ मेयर्स) आयोजन करण्यात आले असता
सोमवारी (दि. 12) महापौर आहेर-आडके यांनी सहाव्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करताना नाशिकच्या विकासदृष्टीचा जागतिक व्यासपीठावर ठसा उमटविला. या परिषदेत सहभागी होऊन त्यांनी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना नाशिकच्या कुंभमेळ्याचे आमंत्रण दिले. परिषदेत नागरी नेतृत्व, शाश्वत विकास ध्येय, सुरक्षित व सक्षम शहरांची निर्मिती, तसेच स्थानिक प्रशासनात महिलांचा 50 टक्के सहभाग या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा झाली.जगभरातील शहरांच्या नेतृत्वाने आपापल्या अनुभवांची देवाणघेवाण करत शहर विकासासाठी नवे दृष्टिकोन मांडले.
महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी यावेळी नाशिकच्या विकास दृष्टीचा मंचावर उच्चार करत, सिंहस्थ कुंभमेळा, नाशिकच्या पायाभूत सुविधा, पर्यटन, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थेवर मत मांडले.नागरी नेतृत्व, शाश्वत विकास ध्येय, सुरक्षित व सक्षम शहरांची निर्मिती, तसेच स्थानिक प्रशासनात महिलांचा 50 टक्के सहभाग या महत्त्वपूर्ण विषयांवर मत मांडत नाशिकच्या विकासदृष्टीचा जागतिक व्यासपीठावर ठसा उमटवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या संबंधित संस्थेच्या पुढाकाराने आयोजित या परिषदेत जगभरातील प्रमुख शहरांचे महापौर, महापालिका आयुक्त आणि नागरी प्रशासनातील प्रतिनिधीना आमंत्रित करण्यात आले होते. राज्यातून हा बहुमान नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर आडके यांना मिळाला आहे. यावेळी स्थायी सभापती मच्छिन्द्र सानप, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन उपस्थित होते.
स्थानिक पातळीवरील नियोजन, लोकसहभाग आणि विकासाच्या आधारावर नाशिकला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचा संकल्प यानिमित्ताने अधिक दृढ झाला आहे. जागतिक विचारमंथनातून नाशिकच्या विकासासाठी नवी दिशा व प्रेरणा मिळाली आहे. भविष्यात नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उंचावण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
– हिमगौरी आहेर-आडके,
महापौर, नाशिक
Mayor presents vision for development at Geneva conference