धर्मांतर घोषणेच्या वर्धापनदिनी आज धम्म मेळावा

येवल्यात भारतीय बौद्ध महासभेतर्फे महासभा, मान्यवरांची उपस्थिती

येवला : प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला शहरातील मुक्तिभूमी येथे धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली होती. या ऐतिहासिक घटनेनिमित्त येवला शहरात मुक्तिभूमी येथे विविध आंबेडकरी पक्ष-संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्धापन दिनानिमित्त बार्टीतर्फे विशेष उपक्रमांचे आयोजन केले असून, भारतीय बौद्ध महासभेतर्फे धम्म मेळावा व अभिवादन सभा आयोजित केली आहे. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर व महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष दीपक गरूड यांनी दिली.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे अण्णासाहेब कटारे व बिपिन कटारे यांच्या उपस्थितीत अभिवादन सभा होणार असल्याची माहिती तुषार वाघ, राजेंद्र मोकळ व गजानन सूर्येकर यांनी दिली. भीमशक्ती संघटनेच्या वतीने शनिपटांगण येथे आयोजित अभिवादन सभेला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे उपस्थित राहणार आहेत. भीमशाहीर सीमाताई पाटील व जॉली मोरे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार असल्याचे महेंद्र पगारे व विजय घोडेराव यांनी सांगितले.पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हावणे व जिल्हाध्यक्ष शशिकांत उन्हावणे मुक्तिभूमी येथे अभिवादन करणार आहेत, अशी माहिती भीमराव खळे व रणजित संसारे यांनी दिली. याशिवाय ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचीही अभिवादन सभा होणार असल्याचे संदीप पगारे यांनी स्पष्ट केले.
अभिवादनासाठी मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व आमदार किशोर दराडे उपस्थित राहणार आहेत. या दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी येवल्यात दाखल होत असल्याने पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. नगरपालिकेतर्फे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता, पिण्याचे पाणी व
इतर सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

लाखो अनुयायांकडून मुक्तिभूमीवर अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनानिमित्त देश-विदेशातून लाखो बौद्ध बांधव व आंबेडकर अनुयायी येवल्यातील मुक्तिभूमी येथे दाखल होत आहेत. निळ्या टोप्या परिधान केलेले युवक, महिला आणि आबालवृद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जयघोष करत मुक्तिभूमीवर नतमस्तक होत आहेत.

Dhamma Gathering Today on the Anniversary of the Conversion Declaration

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *