हक्काची घरे जाण्याच्या भीतीने सफाई कामगार हवालदिल
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
दर्शनपथ (कॉरिडॉर) प्रकल्पाच्या विकासासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे त्र्यंबकेश्वर येथील सफाई कामगार चाळीतील रहिवासी अत्यंत हवालदिल झाले आहेत. अनेक पिढ्यांपासून गावाची सेवा करणार्या या कामगारांच्या डोक्यावरचे हक्काचे छत हिरावले जाण्याच्या मार्गावर असल्याने, “आता आम्ही कुठे जायचे?“ असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाला केला आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनपथाच्या नावाखाली आतापर्यंत तीन व्यापारी संकुले, एक धर्मशाळा, देवस्थान ट्रस्टचे शेकडो वर्षांचे भाडेकरू, तसेच पंचायत समिती, तहसील कार्यालय, स्टेट बँक इमारत, उपजिल्हा रुग्णालय आणि पशुवैद्यकीय दवाखाना यांसारख्या महत्त्वाच्या वास्तू स्थलांतरित करून पाडण्यात आल्या आहेत. या विकासकामांच्या सपाट्यात आता अनेक दशकांपासून गावाची स्वच्छता राखणारे, गटारे साफ करणारे आणि मैला वाहणारे सफाई कामगार व त्यांची कुटुंबे सापडली आहेत.
या कुटुंबांची चौथी-पाचवी पिढी येथे राहत असून, गावाची निष्ठापूर्वक सेवा केल्याचे हेच फळ का, अशी तीव्र भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
पुनर्वसनाबाबत कामगारांचा विरोध
प्रशासनाने या कुटुंबांना पर्यायी व्यवस्था म्हणून वाहनतळावर (पार्किंग झोन) तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याचे शेड उभारून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, या प्रस्तावाला कामगारांनी सक्त विरोध दर्शवला आहे. मुलांच्या तोंडावर परीक्षा आल्या असून या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांचा अभ्यास कसा होणार? तसेच उन्हाळा व इतर ऋतूंमध्ये वयोवृद्ध आणि लहान बालकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. राहण्याच्या दृष्टीने अयोग्य असलेल्या या शेडमध्ये स्थलांतर करण्यास कामगारांनी स्पष्ट नकार दिला आहे.
शहरात घर मिळणे अशक्य
दुसरीकडे, शहरात भाडेतत्त्वावर राहण्यास जाण्याचा सल्ला प्रशासनाकडून दिला जात आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये आगामी कुंभमेळ्याची तयारी आणि वाढलेली गर्दी यामुळे भाड्याने घरे मिळणे अशक्य झाले आहे. सफाई कामगारांना हक्काची घरे सोडल्यास शहरात निवारा मिळण्याची कोणतीही शाश्वती नाही. जोपर्यंत योग्य व सन्मानजनक पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आमची घरे सोडणार नाही, असा ठाम पवित्रा चाळीतील रहिवाशांनी घेतला.
‘Darshan Path’ project crackdown in Trimbakeshwar