रामकुंड परिसरातून दोन हजार विसर्जित गणेशमूर्ती काढल्या बाहेर
नाशिक : प्रतिनिधी
गोदावरी नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नाशिक पाटबंधारे विभागातर्फे रामकुंड परिसरातील, नदीपात्रातून सुमारे दोन हजार विसर्जित गणेशमूर्ती आणि अन्य साहित्य बाहेर काढण्यात आले. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या जलसेवा संकल्प अभियानांतर्गत पंचवटीतील रामकुंड परिसरात श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आगामी ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर सद्या गोदावरीची साफसफाई हाती घेण्यात आली आहे.
राज्यातील जलसंपदा प्रकल्प, सिंचन व्यवस्था, कालवे, धरणे आणि जलाशय यांच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांना अधिक प्रभावी, पारदर्शक, लोकाभिमुख आणि कालबद्ध सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 2 ते 17 ऑक्टोबरदरम्यान जलसेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
नाशिक पाटबंधारे विभागामार्फत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत गणेश विसर्जनादरम्यान नदीपात्रात जमा झालेल्या गणेशमूर्ती आणि अन्य साहित्य बाहेर काढण्यावर भर देण्यात आला. काही दिवसांपूर्वी झालेल्या गणेशोत्सवात अनेक नागरिकांनी रामकुंड परिसरातील, अमरधामजवळील गोदावरी नदीपात्रात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले होते. त्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने पात्रातील विसर्जित गणेशमूर्ती व साहित्य बाहेर काढले. या मोहिमेत कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, उपकार्यकारी अभियंता मयूर सोनवणे, सहाय्यक अभियंता सुभाष पगारे, उपअभियंता प्रशांत ढोकणे, नारायण डावरे आणि पवन डेडवाल, कनिष्ठ अभियंता संघमित्रा धुरंधर, युवराज महाले, विजय ठाकूर आणि वीरेंद्र पाटील, सिंचन शाखाप्रमुख योगेश पाटील, बर्हाटे उपस्थित होते.
Cleaning of the Godavari riverbed under the ‘Jalseva Sankalp Abhiyan’ (Water Service Pledge Campaign).