सरस्वती खुर्दळ यांचा प्रवास
नाशिक : प्रतिनिधी
महिला सक्षमीकरणासोबत आरोग्य जनजागृती, शेतकरी महिला उत्पादक कंपनीची स्थापना महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सरस्वती खुर्दळ यांचे प्रयत्न मोठे ठरले आहेत. एकेकाळी घर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणार्या सरस्वती रामनाथ खुर्दळ यांनी बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली.
महिलांना स्वावलंबी बनविणे, शासकीय योजनांची माहिती तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवणे, आरोग्य तपासणी शिबिरे आणि शेतकरी महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महिला शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करणे, अशी विविध कामे त्या करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी सुमारे 750 महिला शेतकर्यांना एकत्र आणत महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गृहिणीपासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत काम करणार्या सरस्वती खुर्दळ यांचा प्रवास इतर महिलांना नक्कीच प्रेरणादायी आहे.
महिला आपल्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात याबाबत सर्वच महिलांचे एकमत आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहावे आणि आजाराचे वेळीच निदान व्हावे यासाठी सरस्वती खुर्दळ पुढाकार घेत आरोग्य शिबिरे आयोजित करतात. त्या शिबिरांत रक्तातील साखर, रक्तदाब, थायरॉईड, डोळे आणि कर्करोग यांसारख्या आजारांची तपासणी केली जाते. महिलांना आरोग्याविषयी जागरूक करणे आणि गरजेनुसार त्यांना तपासणीची संधी उपलब्ध करून देणे, अशी कामे त्यांनी केली.
गिरणारे परिसरातील 18 ग्रामपंचायती आणि त्याअंतर्गत येणार्या गावांत त्या आरोग्यविषयक जनजागृती व तपासणी शिबिरे आयोजित करतात. या कामासाठी विविध हॉस्पिटल, नेत्र रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सहकार्य मिळते.
किशोरवयीन मुलींनाही त्या मार्गदर्शन करतात. ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी पॅडचा वापर, मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता आणि आरोग्याची काळजी याविषयी माहिती देत ग्रामीण भागातील मुली, महिलांना आरोग्याच्या बाबतीत संकोच न बाळगता योग्य माहिती मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
From Homemakers to a Women Farmers’ Company