कोंडमारा

जीव गुदमरत असला, ऑक्सिजनची कमतरता असली आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्याला घुसमट किंवा कोंडमारा म्हणतात. कोविडच्या दरम्यान अनेक लोकांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांना हा त्रास झालाच असेल.खूप उंच पर्वतारोहण करणारे लोक हा अनुभव नेहमीच घेतात. कारण तिथेही ऑक्सिजन लेव्हल कमी असते. पाण्यात ही जास्त वेळ श्वास रोखून धरला तर जीव गुदमरतो. पण अनेकवार हा फक्त ऑक्सिजन कमी झाल्यावर होणारा कोंडमारा नसतो, आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती येते जेव्हा स्वतचा कितीक कोंडमारा करतो, ते ही आपणच…. प्रत्येक जण ह्या जगात, चांदीचा चमचा मुखात घेऊन जन्माला येत नसतो. प्रत्येकाचे काही भाग्य असते काही पूर्वजन्मीची पुण्याई असते की तो एखाद्या गर्भश्रीमंत घरात जन्म घेतो. आयुष्यभर त्याला कुठल्याच गोष्टीत कमतरता भासत नाही. त्याच्या मुखातून निघाली की लागलीच इच्छा पूर्ण होत असते. त्याने कष्ट, नैराश्य, दुर्भाग्य, दुर्दैव या कुठल्याच गोष्टींचा सामना कधीच केला नसतो. अभाव काय हे त्याला ठाऊकच नसते. जगात सर्वदूर अशीच श्रीमंती आणि सुकाळ आहे असेच त्याला वाटत असते. दरवेळेस फक्त श्रीमंत असणे किंवा सुकाळ असणे हेच आनंदाचे साधन नव्हे. घुसमट असण्याला, याव्यतिरिक्त अनेक कारणे असू शकतात. गौतम बुद्ध यांची कथा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे.
एक ऐश्वर्यसंपन्न राजाचा पुत्र म्हणून, राजाज्ञे मुळे त्याला कधीच गरिबी, रुग्ण, वार्धक्य, मृत्यू हे कळू दिले गेले नाही, पण शेवटी योगायोग कसा झाला की, याच गोष्टी त्याला अवचितपणे कळाल्यानंतर त्याने सन्यास घेतला आणि सत्याच्या शोधात तो चुपचाप घर सोडून निघून गेला. एक राजपुत्राचा तो सन्यस्त होऊन महात्मा झाला. राजमहालात त्याचा कोंडमारा झाला, घुसमट होत होती म्हणून त्याने सर्व त्याग करून हा मार्ग पत्करला. घुसमट अशीही असते की, जी आयुष्यात फार मोठा फेरबदल करून जगण्याचा दृष्टिकोन पूर्ण पालटते.
स्त्रीची घुसमट तर सर्वविदित आहे. फार पूर्वीपासून स्त्रियांवर अत्याचार होत आलेत. एक भोग्या, कमकुवत आणि अबला म्हणून ती जगत आली आहे. पुरुषप्रधान भारतात जवळपास सगळीकडेच स्त्री सोबत भेदभाव होतो. तिला सन्मानाचा, बरोबरीचा दर्जा देण्यात येत नाही. तेव्हापासून ते आजतागायत प्रत्येक स्त्री हा कोंडमारा सोसत आहे. तिच्या आयुष्याचा हा एक भागच झाला आहे. गौतम याची पत्नी यशोधरा आणि रामायणातील लक्ष्मण याची पत्नी ऊर्मिला यांची पती निघून गेल्यावर किती घुसमट झाली असेल? अनेकवार पुरुषालासुद्धा अशी घुसमट होत असते. कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात, आर्थिक किंवा व्यवहारातसुद्धा त्याचा असा कोंडमारा होतो. निश्चितच पुरुष यातून मार्ग काढतात, पण काही वेळेस संकट मोठे असले आणि त्यातून निघण्याचा मार्ग मिळत नाही आणि माणूस खंगत जातो. अनेकवार तो आत्महत्येस ही प्रवृत्त होतो. कारण घुसमट. आजकाल तरुणाईसुद्धा याच घुसमटून तोंड देत आहे. काट्याची स्पर्धा, आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याची गरज आणि समाजात उठून दिसण्याचा अट्टाहास हे तरुण पिढीला कोंडमारा करण्यास पुरेसे आहेत. मधल्या काळात, करिअरवरून पालकांचे आणि मुलांचे वादावाद होत होते. आई-वडिलांच्या पसंतीचे करिअर निवडावे लागत होते. आई-वडिलांवरील प्रेमामुळे आणि त्यांचा आदर म्हणून मुलं आई-वडिलांचे ऐकत होते आणि आपले संपूर्ण आयुष्य घुसमटीत काढत होते. तेव्हाचे तरुण मुलं, पालकांच्या धाकात होते. सर्व आयुष्य ते असाच कोंडमारा झेलत काढायचे. आज तशी स्थिती नाही. प्रत्येक पालक आणि मुलं आता मिळून निर्णय घेतात. त्यामुळे संघर्ष टाळता येतात. आजची तरुण पिढी, बरीच समजूतदार आहे त्यात इंटरनेट, सल्लागार, करिअर काउन्सिलर वगैरे असतात, जे तुम्हाला योग्य सल्ला देतात. एरवी मुलांच्या इच्छेसमोर पालकही जास्त बोलत नाहीत. आता ही घुसमट कमी झाली आहे, पण नवीन कोंडमारा सुरू झाला आहे. शिक्षण घेताना, अतोनात स्पर्धेमुळे मुलांच्या मनात ही खूप घुसमट होते आणि कोवळ्या वयात, घुसमट सहन न झाल्याने कित्येक विद्यार्थी आत्महत्येस प्रवृत्त होतात. आई-वडील नुसते विलाप करत बसतात. त्यांच्यावर येणार्‍या संकटाची, मुलांना कितपतं काळजी असते कुणासं ठाऊक पण ते हे आत्मघातकी पाउल उचलतात हा कोंडमारा झाल्यानंतर. माणसाची मनोदशा व्यक्त करण्यास त्याला एक सामान्य वागणूक मिळत नाही. प्रत्येक जण आपापल्या घुसमटीत, कोंडीत सापडलेला आहे. प्रत्येकालाच जगायचे आहे आणि जगण्यास जे जे उत्तम आहे ते हवे आहे, न मिळाल्यास घुसमट आहे. प्रत्येक क्षेत्रात कोंडमारा आहे, घुसमट आहे. राजनीतिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, व्यापार व्यवसायात आणि कुटुंबात, घुसमट ही सर्वदूर आहे. कोंडमारा हा जगातील प्रत्येक मानव झेलत असतो.

Kondmara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *