खिरापत…

पाचची घंटा झाली शाळा सुटली की, दप्तर पाठीवर अडकवून घराच्या दिशेनं येताना पायात भिंगर्‍या लावल्या की काय इतका वेग वाढायचा. चालताना चालणं कसलं एकदा सुसाट पळत सुटलं की थेट वळणावर असणार्‍या चक्की जवळून यू टर्न घेत, घराच्या कोपर्‍यावर ब्रेक लावायचा. भरभर पायर्‍या चढून माजघरात दप्तर ठेवलं अन् हातपाय धुऊन कपडे बदलून गुलबक्षीची फुले आणायची घाई, तो रंग जाम आवडायचा मला… गुलाबी, लाल, जांभळा या तिन्ही रंगाचं एकत्रीकरण म्हणजे गुलबक्षी.. लांब दांडी आणि नाजूक पाकळ्यांची फुलं सुगंधी नसली तरी भुलाबाईला चालायची यामध्ये पांढर्‍या रंगाची थोड्या शेडिंगची फुलं पण असायची, अंधार पडायच्या आधी परडीभर फुलं आईला दिल्यावर, आई वेणी गुंफतात तसा हार करायची. माझ्या लाडक्या भुलाबाईसाठी.
भुलोजी भुलाबाई म्हणजे शंकर-पार्वतीच्या प्रतीकात्मक मातीच्या मूर्ती. याला गुण भोंडलाही म्हणतात, जो भाद्रपद पौर्णिमेपासून शरद पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. ओसरीतल्या कोनाड्यात थोडी सजावट करून भुलोजी-भुलाबाई विराजमान व्हायचे. सोबतच एक छोटा पाळणा त्यांच्या बाळासाठी, आजूबाजूला आणखी काही सजावटीच्या वस्तू ठेवून तो कोनाडा आणखीच देखणा दिसायचा. बस हेच एक कारण होतं की, दहा दिवस भुलाबाईसमोर गाणी म्हणायची आहे आणि शाळा सुटली की, थेट एक मिनिटही इकडेतिकडे न घालवता घरी पळत सुटायचं. आई रोज दुपारीच नवीन खिरापत तयार करून ठेवायची जी कुणाला ओळखता येणार नाही. आणि आपल्या घरची खिरापत कोणीच ओळखू शकत नाही याचंही अप्रूप वाटायचं मला त्यावेळी. खिरापत म्हणजे प्रसादाचा खाऊ, हा बंद डब्यात ठेवायचा आणि तो डबा हलवायचा त्याच्या आवाजावरून मुली ओळखायच्या आत काय आहे? पण यातही युक्त्या वापरल्या जायच्या जसे की, शंकरपाळी असेल तर खुळखुळ आवाज येऊ नये म्हणून डब्यात डबा फसवून थोडी फसवेगिरी करायची. कधी पदार्थाच्या वासावरूनही थोडीफार हिंट मिळायची किंवा किराणाच्या दुकानातून काही आणताना जर कुणी पाहिलं तर तोही तर्क लावला जायचा. मुलींच्या घोळक्यात मीही सामील होऊन त्यांच्या घरी गाणी म्हणायला जायचे. गाणी पाठ असली तरीही कच्चं लिंबू म्हणून कुणी तसं सिरीयसली घेत नव्हतं. जवळपास सगळ्या पोरी माझ्यापेक्षा वयानी मोठ्या होत्या…मी चौथी-पाचवीत असेल बहुतेक.
आपण गेलो तर त्याही आपल्याकडे येतील. म्हणजे ते तसंच होतं.आपण ज्यांच्याकडे गाणी म्हणायला जातो तेच आपल्याकडे येतात, असाच नियम होता त्यांचा. त्या पोरी सारख्या म्हणायच्या आता किनई तुझ्या घरी जाऊया आणि दुसर्‍या घरी निघून जायच्या, असं करता करता सर्वांच्या घरी गाणी म्हणता म्हणता मुली कमी कमी होत जायच्या. मग शेवटची जी घरं राहायची त्यांच्याकडे, आता खूप उशीर झाला म्हणून आपण आज पाचच गाणी म्हणूया, उद्याला तुझ्याकडे आधी येऊ, असं म्हणत मन समजावणी करायच्या. आपण आधी दहा-पंधरा घरी गाणी म्हटली अगदी अ पासून ज्ञ पर्यंत… आणि आपल्याकडे आल्यावर या पोरी रोज शॉर्टकट मारतात. म्हणतात कारल्याची बी खूप खूप मोठं आहे आपण दुसरं म्हणू… दोन गाणी झाली की लगेच अडकीत जाऊ खिडकीत जाऊ शेवट करायच्या आणि का तर आपण लहान आहोत आपल्याला काही कळत नाही म्हणून. खूप वाईट वाटायचं. एक दिवस तर शेवटचं माझं घर होतं आणि कुणीही आलं नाही, हिरमुसला चेहरा करून घरी आल्यावर आईला सांगितलं, आज कुणीच नाही आलं. आई म्हणाली, चल आपणच आज गाणी म्हणूया. मग मायलेकींनी मनसोक्त भुलाबाईची गाणी म्हटली. आणि त्या दिवशीची खिरापत मी एकटीने संपवली… तशी लहान बहीण आणि भाऊपण होते, पण पुन्हा तेच ती दोघंही माझ्यापेक्षा लहान म्हणजे कच्चं लिंबू मीपण त्यांना सिरीयसली घेतलं नाही.

A small, blessed offering…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *