मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वरला ध्वजस्तंभ पूजन

कामे वेळेत पूर्ण करण्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांचा भर

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे काल सकाळी धार्मिक विधी आणि मंत्रोच्चाराच्या घोषात राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजस्तंभ पूजन करण्यात आले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन, विविध कामांचे सूक्ष्म नियोजन आणि विकासकामांची निर्धारित वेळेत पूर्तता यांना प्राधान्य देण्यात येत आहे. राष्ट्रपती महोदयांच्या नियोजित दौर्‍याच्या पार्श्वभूमीवरही संबंधित यंत्रणांनी आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केले.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, भाविकांच्या सोयीसुविधा, सुरक्षाव्यवस्था आणि विविध विभागांमधील समन्वय या बाबी महत्त्वाच्या आहेत. सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून नियोजनानुसार कामांना गती देण्यावर भर दिला जात आहे.
या पूजन सोहळ्यास आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्ष पल्लवी शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, सहायक धर्मदाय आयुक्त विवेक सोनुने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी सानप, मुख्याधिकारी गोविंद जाधव, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, नाशिक पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध आखाड्यांचे प्रमुख, साधू, संत, महंत, भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा संगम असलेल्या या सोहळ्याच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरमधील नियोजनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. भाविकांना सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सोयीस्कर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर शहरात नाराजी अन् रोष
एका बाजूला शासकीय सोहळे सुरू असताना, त्र्यंबकेश्वर शहरात मात्र प्रचंड नाराजी व असंतोष धुमसत आहे. कुंभमेळा आयोजनासाठी साधुग्राम व विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेली शेतजमीन, शहरात सुरू असलेली तोडफोड आणि त्यामुळे संतप्त झालेले ग्रामस्थ यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सिंहस्थ आयोजनाबाबत अनास्था निर्माण झाली आहे.

ध्वजस्तंभाची माहिती
ध्वजस्तंभाची उंची 31 फूट आहे. समुद्रमंथनाची संकल्पना ध्वजस्तंभावर साकारण्यात आली आहे. मंथनातून प्राप्त रत्ने ध्वजावर आहेत. खालील भागात श्रीगणेशाची प्रतिमा साकारली आहे. सर्वांत वरील भागात अमृत कलशधारी गरुडाची प्रतिमा आहे.

सिंहस्थ ध्वजस्तंभ कार्यक्रम वादात
सिंहस्थ ध्वजपूजनाचे आयोजन त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने केले होते. नगरसेवकांनादेखील त्याचे अधिकृत निमंत्रण नव्हते. याचा थेट परिणाम काही पुरोहित नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. पुरोहित संघाचे सदस्य समीर पाटणकर यांच्या सुविद्य पत्नी उपनगराध्यक्षा वेदिका पाटणकर या अनुपस्थित राहिल्या. त्यांनी नगरपरिषद सदस्यांचा अवमान आयोजकांनी केला असल्याचे म्हटले आहे. ध्वजस्तंभ कार्यक्रम आता वादात सापडला आहे

Worship of the flagpole at Trimbakeshwar amidst chanting of mantras

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *