डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना
♣ ‘नवदुर्गा’ ♣
नाशिकरोड : अनिल गुंजाळ
नवरात्र सुरू झाले की, घरोघरी देवीची स्थापना होते. नऊ दिवस उपवास, पूजाअर्चा आणि आराधनेतून आदिशक्तीचा जागर केला जातो. मात्र, नाशिकच्या एका महिला डॉक्टराने नवरात्रात देवीची स्थापना करण्याऐवजी थेट नागालँड गाठत रुग्णसेवेचा वसा जपला. आजारी रुग्णांची सेवा, त्यांच्या आरोग्याची काळजी आणि वैद्यकीय मदतीच्या माध्यमातून माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याचा त्यांचा हा प्रयत्न नवरात्रातील शक्तीच्या उपासनेला वेगळा अर्थ देणारा आहे. नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कंचन भारती हासानंद लोकवाणी यांनी आपल्या कृतीतून सेवेलाच साधना मानणार्या ‘नवदुर्गे’चे दर्शन घडविले आहे.
नवरात्र हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर शक्ती, धैर्य, करुणा आणि सेवाभावाची आठवण करून देणारा काळ आहे. देवीची आराधना करताना तिच्यातील ममत्व, सामर्थ्य आणि संकटात मदतीला धावून जाण्याची वृत्तीही जपली जाते. याच भावनेतून डॉ. लोकवाणी यांनी नवरात्राच्या काळात भारतीय सेनेच्या सहाय्याने नागालँडमध्ये रुग्णसेवेला प्राधान्य दिले. आपल्या नेहमीच्या कार्यक्षेत्रापासून दूर जाऊन रुग्णसेवा करण्याची त्यांची ही भूमिका ‘नवदुर्गा’ सदरासाठी विशेष ठरते. कारण काही जणी देवीची पूजा करतात, तर काही जणी आपल्या कार्यातून माणुसकीची पूजा करतात.
डॉ. कंचन लोकवाणी गेल्या 26 वर्षांपासून नाशिक महापालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, रुग्णांच्या आरोग्याप्रति असलेली जबाबदारी आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील कामाचा अनुभव त्यांच्या कार्याची ओळख आहे.
सिंधी उद्योजक कुटुंबातील पहिल्या पदवीधर
डॉ. लोकवाणी यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. औद्योगिक आरोग्य विषयातील फेलोशिपही प्राप्त केली आहे. सिंधी उद्योजक कुटुंबातील पहिल्या पदवीधर होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. वैद्यकीय क्षेत्राची निवड करून त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या आरोग्यासाठी केला. गेल्या 26 वर्षांपासून नाशिक महापालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे. नवरात्रात देवीची स्थापना न करता रुग्णसेवेला प्राधान्य देण्यामागील त्यांची भूमिका ही धार्मिक परंपरेपेक्षा वेगळी वाट निवडण्याची बाब नसून, भक्तीचा अर्थ कृतीतून व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. नागालँडमध्ये भारतीय सेनेच्या मदतीने भारत म्यानमार बोर्डर येथील गरजवंतांच्या रुग्णसेवेला प्राधान्य देणार्या डॉ. कंचन लोकवाणी यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग गरजू रुग्णांच्या सेवेसाठी करणार्या आणि कर्तव्यालाच साधना मानणार्या डॉ. लोकवाणी या खर्या अर्थाने ‘नवदुर्गा’ आहेत.
Undertaking a mission of patient care in Nagaland during Navaratri