‘बाळा’ला सजवण्याचा नादच खुळा!

सोशल मीडियावर लहान मुलांचे देवीरूपातील फोटोशूट व्हायरल

नाशिक : देवयानी सोनार

सध्या सोशल मीडियावर एक ते तीन महिन्यांच्या बाळाचे देवीस्वरूपात वेशभूषा करून फोेटोसेशन केल्याचे व्हिडीओ, फोेटोज् व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर एखादा ट्रेंड व्हायरल झाला तर तो आपण फॉलो केलाच पाहिजे, अशी मानसिकता सध्या नेटकर्‍यांची झाली आहे. त्यामुळे फोटोशूटसाठी वाट्टेल ते केले जात आहे.
लहान मुलांचा निरागस चेहरा, त्यांचे सहज हावभाव, खोड्या, वावर मनाला आनंद देतो. क्षणभर माणूस लहान मुलांच्या उपस्थितीने सर्व दुःख विसरून लहान होतो. लहान मुलांसोबतचे क्षण कायमस्वरूपी जतन करून ठेवावेत यासाठी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला आहे. त्या ट्रेंडची कॉपी करताना पालक मुलांना नकळत शिक्षा देत आहेत की आनंद मिळवत आहेत, याचा विचार करायला हवा.
नवरात्रोत्सव सुरू आहे. नवरात्रानिमित्ताने अगदी लहान न कळत्या मुलामुलींचे देवीदेवतांची वेशभूषा, केशभूषा करून फोेटोशूट केले जात आहे. या फोटोशूटवर नेटकर्‍यांनी सडकून टीकाही केली आहे.
स्वतःच्या हौसेखातर मुलांना त्रासदायक असे फोेटोशूट करून नक्की कोणता आनंद मिळविला जात आहे?
सोशल मीडियावर गेल्या वर्षी एका दोन ते तीन महिन्यांच्या मुलीचा देवीस्वरूपातील फोेटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मुलीचा निरागस चेहरा आणि देवीस्वरूपात मुलीचे कोडकौतुक पालकांनीही योग्य ती खबरदारी घेत फोेटोशूट केले. त्या शूटला व्ह्यूज आणि लाइक्सचा अक्षरशः
पाऊस पडला होता. एखादा ट्रेेंड सोशल मीडियावर हिट झाला की त्याचीच कॉपी नेटकर्‍यांकडून केली जाते. त्यासाठी कितीही पैसे मोजायला ते तयार असतात.
देवीच्या रूपातील लहान मुलांचे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नऊवारी साडी, मुकुट, दागिने आणि विविध अलंकारांनी सजविलेल्या कधी तुळजापूरची श्री तुळजाभवानी, कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, माहूरची श्री रेणुका माता, श्री सप्तशृंंगीदेवी आदी स्वरूपातील देवी, तसेच कालिका, जेजुरीचा खंडोबा,
भगवान शंकर आदी रूपे या बाळांचीं साकारून
फोटोशूट केले जात आहे.
पालकांसाठी श्रद्धा किंवा आठवणी जपणे हा उद्देश असला, तरी यासाठी मुलांना जड कपडे घालावे लागत असतील किंवा बराच वेळ एकाच स्थितीत बसवले जात असेल तर त्याचा विचार करणे गरजेचे आहे.

फोटोशूटचे आकर्षण
फोेटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना मिळणार्‍या पसंतीमुळे पालकांनाही अशा फोटोशूटचे आकर्षण वाटू लागले आहे. पण या सगळ्या उत्साहात मुलांचा आराम आणि त्यांची सुरक्षितता, निरागसपणा जपला जातो का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. फोेटोशूट करताना फोेटोग्राफर्स आणि त्यांची टीम सर्व काळजी घेत असल्याचा दावा करीत असले, तरी प्रत्यक्षात त्या बाळाच्या त्वचेला रंग, मेकअप, दागिने, कपडे, मुकुट आदींचा त्रास होतो का, ते पाहणे महत्त्वाचे आहे.

व्यवसाय म्हणून चांगले आहे; परंतु एक महिन्याच्या बाळाला फक्त सोशल मीडियासाठी काही तास फोटोग्राफीसाठी बसवणे, त्याचा मेकअप, आकर्षित देवीच्या रूपामध्ये दाखविण्याचा अट्टहास व वेगळे काही करण्यासाठी त्याचा वापर होऊ नये, असे माझे मत आहे.
– संजय जगताप, छायाचित्रकार, अध्यक्ष, नाशिक फोटोग्राफर्स असोसिएशन

The passion for dressing up ‘Bala’ is truly something else!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *