त्र्यंबकेश्वरला कुशावर्तावरील ध्वजस्तंभावरून वाद

सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच सुरक्षेची धाकधूक; 24 तास खडा पहारा

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त घाटावर उभारलेल्या शासनाच्या 30 लाखांच्या ध्वजस्तंभावर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे बोधचिन्ह (लोगो) वापरल्याने नवा वाद पेटला आहे. पालकमंत्र्यांनी याबाबत कोणताही वाद नसल्याचे म्हटले असले, तरी सावधगिरी म्हणून ध्वजस्तंभाच्या रक्षणासाठी 24 तास गृहरक्षक दलाचा (होमगार्ड) खडा पहारा तैनात केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा शासन, नगर परिषद, पुरोहित संघ आणि इतर वतनदार मानकरी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणारा हिंदू समाजाचा विश्वसोहळा आहे. त्यामुळे शासनाच्या निधीतून उभारलेल्या स्तंभावर केवळ एकाच घटकाचे प्रतीक कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नुकत्याच झालेल्या ध्वजस्तंभपूजन सोहळ्याला नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व सदस्यांना निमंत्रित न केल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींमध्येही तीव्र नाराजी आहे.
गेल्या महिन्यात नाशिकमधील बैठकीत सादर केलेल्या सुवर्ण मुखवटा प्रतिकृतीवर जुना आखाड्याचे महामंत्री हरिगिरी महाराज यांनी नापसंती व्यक्त केली होती.
त्यानंतर काल-परवा पार पडलेल्या ध्वजस्तंभ पूजनास जुना आखाड्याचे महंत व साधू अनुपस्थित राहिल्याने भविष्यातील वादाची नांदी मानली जात आहे. याशिवाय, शहरातील दुकानांची तोडफोड, राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांचे नागरिकांशी आणि लोकप्रतिनिधींशी झालेले वाद, तसेच कुशावर्त जलशुद्धीकरण यंत्रणेच्या कामातील अडथळे यामुळे स्थानिक त्र्यंबकवासीयांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
प्रशासनाने भरघोस निधी मंजूर केला तरी स्थानिक नागरिक, साधू-महंत आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्यास प्रत्यक्ष ध्वजारोहणावेळी अघटित घडण्याची दाट शक्यता ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी जागवल्या कटू आठवणी

1992 चा बहिष्कार : शासन राजपत्रात व निमंत्रण पत्रिकेत उदासीन आणि निर्मल संप्रदायासाठी चौथे शाही स्नान मुद्रित केल्याच्या मुद्द्यावरून नागा साधूंनी मुख्य श्रावण अमावास्येच्या शाही पर्वस्नानावर बहिष्कार टाकला होता. 2003 चा हल्लाबोल : सार्वजनिक न्यासांच्या जमिनींबाबत शासनाच्या कायद्याला विरोध दर्शवत जुना आखाड्याच्या साधूंनी ध्वजारोहण रोखण्याचा प्रयत्न केला होता. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ कुशावर्त चौकात आले असता, काही साधूंनी तलवारीसह त्यांच्या वाहनाला घेराव घातला होता; परंतु पोलिसांनी कुशलतेने तो प्रसंग हाताळला होता.

 

Dispute over the flagstaff at Kushavarta in Trimbakeshwar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *