गोदाकाठी घुमणार 501 शंखवादकांचा ‘शंखनाद’

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर येत्या 25 ऑक्टोबरला संध्यकाळी 5 वाजता गोदाकाठी अनंत विजय शंखनाद संस्थेचे 501 शंखवादक एकाच वेळी शंखनाद करणार आहेत. या उपक्रमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह
यांनी दिली.
नाशिक, त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात रविवारी संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, महंत भक्तीचरणदास, उपाध्यक्ष शांताराम भानोसे, नृसिंह कृपादास, सचिव मुकुंद खोचे, राजेंद्र फड, धनंजय बेळे, प्रफुल संचेती, अनंत विजय, शंखनादच्या वतीने वृषाली घोलप, प्रदीप बच्छाव
उपस्थित होते. या भव्य शंखनादासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. ताल, लय आणि वेळेचे अचूक नियोजन साधण्यासाठी सर्व 501 शंखवादक दररोज दोन तास सराव करत आहेत. धार्मिक परंपरेत शंखनादाला पवित्र आणि मंगलमय मानले जाते. पूजेपासून ते शुभप्रसंगी शंखनाद केला जातो. याच परंपरेला मोठ्या सांस्कृतिक उपक्रमाचे स्वरूप देण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमात धार्मिक परंपरा आणि आधुनिक विश्वविक्रमाचा संगम पाहायला मिळणार आहे.

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत गोदाआरती
शंखनाद विक्रमासह 31 ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत 6500 आदिवासी बांधवांच्या हस्ते गोदाआरती करण्यात येणार आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समिती व पुरोहित संघातर्फे ही आरती होणार असून, या महाआरतीचादेखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न आयोजकांचा राहणार आहे.

The ‘conch-call’ of 501 conch-blowers will resound along the banks of the Godavari.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *