देवळालीगावात बोहड्यातील रेणुकामाता देशमुख वाड्यात

सुमारे 100 वर्षांची परंपरा जोपासत आहेत भाविक

नाशिकरोड : एस. आर. सुकेणकर
एकेकाळी देवळालीगाव बारा बलुतेदारांनी स्वयंपूर्ण असे खळखळत वाहणार्‍या वालदेवी किनार्‍यावरील एक छोटेसे गाव. आजही तेली गल्ली, लोहार गल्ली, कुंभार गल्ली गावाच्या पूर्वेला हरिजन वस्ती, देशमुख वाडे आदी आजही त्याच्या खुणा दिसून येतात. या गावात वेशीवर शनि मंदिराबरोबरच दोन हनुमान मंदिरे आहेत. गावात धार्मिक, सामाजिक, वैचारिक, राजकीय कलाप्रेमी अशी विविध विचारसरणीची माणसे आहेत. तरीसुद्धा गावात एकोपा होता.
सुमारे 100 वर्षांपासून अगदी 1952-53 पर्यंत या गावात बोहडा अतिशय आनंदाने पार पडत. गावातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या त्या काळच्या ओट्यांवर ग्रामस्थ हा बोहडा पाहण्यासाठी रात्रभर बसून असत. गावातील हौशी कलाकार या बोहड्यात विविध देवीदेवतांची सोंगे नाचवत. त्या सोंगांची माहिती म्हणजे बतावणी कलगीतुरा कलाकार गेणूजी गायकवाड करत. या दशावतारी बोहड्याने सर्व प्रफुल्लित होत.
या बोहड्यात खेलूकर परिवार रेणुकामातेची सुमारे आठ फूट मूर्तीची आकर्षक भव्य प्रतिमा नाचवत बोहड्यानंतर ही प्रतिमा खालकर परिवाराला सांभाळण्यास जागेची अडचण भासू लागल्याने त्यांनी चैतन्य देशमुख यांचे आजोबा नारायणराव देशमुख यांच्याकडे जागेची मागणी केली आणि ही भव्य प्रतिमा देशमुख वाड्यात ओसरीवर ठेवण्यात आली. देशमुखांचीही कुलस्वामिनी रेणुकामाता असल्याने सर्वच जण या ओसरीवरील मातेची पूजाअर्चा करत राहिले. पुढे हा भेंड्याच्या मातीचा भव्य वाडा मोडकळीला आला. देवीवर माती गळू लागली. शेवटी 1999 मध्ये देशमुख वाड्याची पुनर्बांधणी करतानाच या रेणुकामातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. 2008 पर्यंत भाविकांची गर्दी वाढतच गेली.
खेलूकर परिवारासह लासुरे, देशमुख आदी कुळांतील भाविक नवरात्रीला येथे दरवर्षी घटस्थापना करत आलेले आहेत. दैनंदिन पूजाअर्चा देशमुख परिवार करीत असला तरी नित्याचे दर्शन घेण्यास प्रातःकाळी व सायंकाळी भाविक एकत्र येत. या मूर्तीचा
जीर्णोद्धार करण्याची कल्पना सर्वांनीच एकविचाराने मांडली. देशमुखांनी ती उचलून धरली आणि 2008 मध्ये प्रतापराव देशमुख, अशोकराव देशमुख, अविनाशराव देशमुख यांनी राजस्थानातून मार्बलची सुबक, आकर्षक मूर्ती आणली आणि तिचा मोठ्या स्वरूपात जीर्णोद्धार करतानाच पुन्हा मंदिराचेही सुशोभीकरण केले. त्यामुळे भाविकांची श्रद्धा वाढत गेली. देवीवर सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचा मुकुट, चांदीची छत्री आणि इतरही दागदागिने भाविकांच्या दातृत्वातून देवीवर चढविण्यात आले. सध्या चैतन्य देशमुख, त्यांचे बंधू कृष्णा देशमुख दैनंदिन पूजा, अर्चा करत असले तरी रेणुकामाता मित्रमंडळाचा प्रत्येक कार्यक्रमात मोठा सहभाग असतो. सुमारे 100 वर्षांची देवीची परंपरा गावातील भाविकांनी जोपासली आहे. त्यामुळे नवसाला पावणारी रेणुकामाता अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी येथे 35 ते 40 घटांची स्थापना केली जाते. कृष्णा देशमुख यांनी सपत्नीक पहिली घटस्थापना करून या नवरात्र महोत्सवाची सुरुवात केली. रेणुकामाता मित्रमंडळ कोजागरी पौर्णिमेपर्यंत येथे विविध धार्मिक कार्यक्रम
राबवित आहेत.

At the Renukamata Deshmukh Wada in Bohada, Deolali Gaon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *