पाच एकर द्राक्षबागेची धुरा सांभाळत यशस्वी शेती

नवरात्रोत्सव : नैताळेच्या रूपाली बोरगुडे यांची यशोगाथा

निफाड : अण्णासाहेब बोरगुडे
नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीचा जागर आणि स्त्रीशक्तीचा गौरव! संकटांवर मात करण्याच्या या उत्सवाच्या निमित्ताने निफाड तालुक्यातील नैताळे येथील रूपाली आनंदा बोरगुडे यांची संघर्षमय यशोगाथा विशेष प्रेरणादायी ठरत आहे. पतीच्या निधनानंतर खचून न जाता, पाच एकर द्राक्षबागेची यशस्वी जोपासना करत आणि तीनही मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करत त्यांनी ग्रामीण भागातील स्त्रीशक्तीचा आदर्श निर्माण केला आहे.
नैताळे येथील प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शेतकरी आनंदा नरहरी बोरगुडे यांचे 29 सप्टेंबर 2017 रोजी निधन झाले. या मोठ्या आघातामुळे शेतीचा अनुभव, कुटुंबाची जबाबदारी आणि मुलांचे भविष्य असे अनेक प्रश्न रूपाली बोरगुडे यांच्यासमोर उभे राहिले. बी.ए.पर्यंत शिक्षण झालेल्या रूपालीताईंनी हार न मानता धैर्याने शेतीची सूत्रे हाती घेतली. पतीच्या अनुभवातून मिळालेले ज्ञान आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी द्राक्षबागेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन सुरू केले. द्राक्षशेती हा अत्यंत खर्चिक, मेहनतीचा आणि हवामानातील बदलांचा फटका बसणारा व्यवसाय आहे. तरीही रोग-किडींचे व्यवस्थापन, पाणी व खतांचा योग्य वापर आणि मजुरांचे नियोजन करत त्यांनी बागेची विशेष काळजी घेतली. आज त्यांच्याकडे स्वतःचा ट्रॅक्टर आणि शेतीची आधुनिक अवजारे उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात महिला शेतीत राबत असल्या तरी त्यांना नियोजनात मुख्य स्थान कमीच मिळते. मात्र, रूपाली बोरगुडे यांनी शेतीचे संपूर्ण व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन स्वतः करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवरात्रात केवळ देवीची पूजा न करता, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठणार्‍या नैताळेच्या या रणरागिणीचा प्रवास हा प्रत्येक महिलेसाठी आर्थिक स्वावलंबन आणि नियोजनाची मोठी प्रेरणा आहे.

रूपालीताईंच्या योगदानाची दखल

2019 : आयडियल फार्मर अवॉर्ड. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ व नाशिक येथील जिजाऊ फाउंडेशनतर्फे सन्मान. 2021 : उमंग महिला फाउंडेशनतर्फे विशेष पुरस्कार.

मुलांच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण

शेती सांभाळतानाच त्यांनी मुलांच्या उच्च शिक्षणाला प्राधान्य दिले.
मोठी मुलगी स्नेहल सध्या अमेरिकेत एम.एस.चे उच्च शिक्षण घेत आहे. दुसरी मुलगी स्वराली नाशिक येथे बी.ई. करत आहे. मुलगा शुभम अकरावीत शिकत आहे.

Successful farming through the management of a five-acre vineyard

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *