यूपीएससीच्या स्वप्नाचा प्रवास धरणाच्या पाण्यात

डोणगावच्या पंचवीसवर्षीय राहुलचा मृत्यू

चांदवड : प्रतिनिधी
मुलाने मोठे होऊन अधिकारी व्हावे आणि गरिबी दूर करावी, या आशेने डोणगाव येथील वाहनचालक बाळू सोमासे यांनी मुलगा राहुलच्या शिक्षणासाठी आयुष्यभर कष्ट उपसले.
यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीत राहून जिद्दीने अभ्यास करणार्‍या राहुलचा (वय 25) वागदर्डी धरणात बुडून मृत्यू झाला. दसरा-दिवाळीच्या सणासाठी गावी आलेल्या राहुलच्या जाण्याने सोमासे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सणासाठी गावी आल्यानंतर दुसर्‍याच दिवशी काळाने घाला
घातला. दिल्लीत प्रशासकीय सेवेची तयारी करणारा राहुल बुधवारी (दि. 14) रात्री सणासाठी घरी आला होता. गुरुवारी (ता. 15) चुलते शिवाजी सोमासे यांचा आजारी बैल पोहण्यासाठी घेऊन राहुल चुलत भावासोबत वागदर्डी धरणावर गेला होता. बैलाला पाण्यात नेताना खोलीचा अंदाज न आल्याने राहुल पाण्यात बुडाला. बाहेर पडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वडिलांच्या कष्टाचे पांग
फेडून कुटुंबाला सुखाचे दिवस दाखविण्याचे राहुलचे स्वप्न अधुरेच राहिल्याने डोणगावसह चांदवड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

The journey toward a UPSC dream ends in the waters of a dam.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *