नाशिकच्या रिअल इस्टेटमध्ये 125 कोटींची उलाढाल

दसर्‍याला नाशिककरांनी साधला गृह खरेदीचा मुहूर्त

नाशिक : प्रतिनिधी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याच्या मुहूर्तावर नाशिककरांनी गृह खरेदीचा मुहूर्त साधला असून, विविध बांधकाम प्रकल्पांवर ग्राहकांनी भेट देत फ्लॅट्सचे बुकिंग करत दसर्‍याच्या मुहूर्तावर 300 हून अधिक फ्लॅटची खरेदी केली. त्यामुळे विजयादशमीला 125 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज बांधकाम व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दसरा म्हटला की खरेदीला उधाण, असेच समीकरण आहे. दसर्‍याच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यातच काही व्यावसायिकांनी ग्राहकांवर ऑफर्सचा वर्षाव केल्याने सकाळपासूनच ग्राहकांनी खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले. विशेषत: कपडाबाजारात अनेकांनी सहपरिवार खरेदीचा आनंद घेतला. त्याचबरोबर पूजेच्या साहित्यातही मोठी उलाढाल झाली. दसर्‍याच्या मुहूर्ताला रिअल इस्टेटमध्येही उत्तम वातावरण बघावयास मिळाले.
अनेकांनी या शुभमुहूर्तावर नूतन घरात गृहप्रवेश केला. तसेच फ्लॅट व रो-हाउस यांची बुकिंग केली. गेल्या काही दिवसांपासून नवीन घरांबाबत विचारणा करण्यात येत होती. परंतु, दसर्‍याच्या निमित्ताने चांगली बुकिंग झाली असून, रिअल इस्टेटमध्ये फिलगुड वातावरण असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.

दुष्काळाचा काही अंशी परिणाम
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुष्काळाचे सावट असल्याने काही प्रमाणात गृह खरेदीवर परिणाम जाणवल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

परवडणार्‍या घरांना पसंती
नागरिकांकडून शहरात गृह खरेदी करताना परवडणार्‍या घरांना पसंती दिल्याचे चित्र होते. 20 ते 40 लाख किमतीच्या घरांचे अधिक बुकिंग झाल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रीचे 9 दिवस आणि आजच्या दसर्‍याच्या मुहूर्तावर शहरात 100 पेक्षा जास्त नवीन बुकिंग, 55 पेक्षा जास्त गृहप्रवेश आणि 125 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे. ग्राहकांचा हा उदंड प्रतिसाद नाशिकच्या गृहनिर्माण क्षेत्रावरील दृढ विश्वास आणि शहराचा वाढता विकास दर्शवतो.
– गौरव ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो

दिवसभरात 300 ते 350 फ्लॅट विक्री झाल्याचा अंदाज आहे. ग्राहकांकडून 35 लाखांपर्यंतचे टू बीचके व 25 लाखांपर्यंतच्या वन बीएचके फ्लॅटला पसंती देण्यात आली. नाशिक शहरात दरवर्षीच शहरातील नागरिकांसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार भागातील नागरिक गुंतवणुकीसाठी पसंती देत असतात. यंदा दुष्काळाच्या सावटाचा काही प्रमाणात गृह खरेदीवर परिणाम झाल्याचे जाणवले.
– सुनील गवादे, माजी अध्यक्ष, नरेडको

Rs 125 crore turnover in Nashik’s real estate sector

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *