ध्वजारोहणासाठी गोदाघाट होतोय सज्ज!

जय्यत तयारी : 29 पथकांकडे व्यवस्थेची जबाबदारी

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकनगरीत धार्मिक व आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती येणार आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्याने सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक श्रीगणेशा होईल. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडून जय्यत तयारी सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणेने विविध व्यवस्थांच्या पूर्ततेसाठी नियोजनाला वेग दिला आहे.
रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ परिसरासह सोहळ्याशी संबंधित ठिकाणांवर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी 29 विविध पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाकडे स्वतंत्र जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांची तपासणी, विद्युत रोषणाई आणि प्रकाशव्यवस्थेचेही नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या दिवशी मान्यवर आणि उपस्थितांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय राखला जात आहे. ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला 30 ऑक्टोबर रोजी शहरातून ग्रामपरिक्रमा काढण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता तपोवनातील मोदी मैदान येथून या परिक्रमेला प्रारंभ होईल. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धार्मिक उपक्रम पार पडणार आहे. ग्रामपरिक्रमेच्या निमित्ताने गोदावरीच्या दोन्ही तीरांवर एक लाख दिवे प्रज्वलित करून गोदामातेचे पूजन व महाआरती करण्याचे नियोजन आहे. रामकुंडापासून टाळकुटेश्वर पुलापर्यंत गोदातीराच्या दोन्ही बाजूंनी आरती करण्यात येणार आहे.

विविध पथकांकडे जबाबदार्‍या
♦ निमंत्रण पत्रिकांचे वाटप आणि मान्यवरांच्या स्वागताचे नियोजन.
♦ वाहनतळ, पार्किंग आणि सुरक्षा बंदोबस्त.
♦ विमानतळ व हेलिपॅडची व्यवस्था.
♦ खाद्यपदार्थांची तपासणी.
♦ विद्युत रोषणाई आणि प्रकाशव्यवस्था.

Godaghat is getting ready for the flag-hoisting ceremony!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *