दोन हजार नळ कनेक्शनधारकांना मनपातर्फे नोटिसा
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील पाणीमीटर नादुरुस्तप्रकरणी महापालिकेच्या करसंकलन विभागाने दोन हजारांहून अधिक नळ कनेक्शनधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. संबंधितांना दंड ठोठावण्यात आला असून, त्यांनी तो न भरल्यास थेट नळकनेक्शन बंद केले जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणावरून महापालिका प्रशासन आक्रमक झाले आहे.
शहरातील पाणीपट्टी देयके वाटपाबरोबरच पाणीमीटर योग्यपणे कार्यान्वित आहे का नाही? याची तपासणी केली जात आहे. क्रॅनबेरी या खासगी संस्थेद्वारे ही कारवाई केली जात आहे. खासगी मक्तेदारामार्फत शहरातील नळकनेक्शनचे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर नियमांचे उल्लंघन आढळलेल्या नळ कनेक्शनधारकांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पाणीमीटर अर्थात जलमापक सदोष असलेल्या 2,151 नळकनेक्शन धारकांना दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधितांनी येत्या पंधरा दिवसांत जलमापक दुरुस्त न केल्यास दुप्पट पाणीपट्टी आकारणीचा इशारा दिला आहे. सातपूर विभागात सर्वाधिक 453 नळ कनेक्शनधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. क्रॅनबेरी या मक्तेदारामार्फत शहरातील दोन लाख 40 हजार 170 नळकनेक्शनची तपासणी करण्यात आली. यात केवळ 74 हजार 463 नळकनेक्शनवरील जलमापक नियमानुसार सुस्थितीत आढळले, तर एक लाख 65 हजार 707 नळ कनेक्शनधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसले.
…then you will have to pay double the water charges!